

नेकनूर ः नेकनूर येथील मुख्य रस्त्यावर असणाऱ्या वीज कंपनीच्या कार्यालयाची दुरवस्था पाहता ते कोसळण्याची भीती असल्याने या ठिकाणी अधिकारी, कर्मचारी दोन वर्षांपासून बसत नाहीत. इमारतीच्या बांधकामाची गरज असताना या ठिकाणी इमारत जैसे ते ठेवत कंपाउंड वॉलचे काम चालू झाल्याने आश्चर्य व्यक्त होत असून शासनाचा निधी कसा पाण्यात जातो याचे हे उदाहरण पहायला मिळते.
कनिष्ठ अभियंता आणि परिसरातील कर्मचाऱ्यांसाठी नेकनूरच्या वीज कंपनीचे कार्यालयाची इमारत नेकनूरच्या बाजार तळावर खूप जुनी आहे. ही इमारत आता पूर्णतः मोडकळीस आली असून मागच्या दोन वर्षात या ठिकाणी कर्मचारी जीव धोक्यात ठेवून अधूनमधून थांबायचे. मात्र अलीकडे सबस्टेशनमधूनच नेकनूर परिसराचा कारभार सुरू झाल्याने या ठिकाणी कोणी थांबायला तयार नव्हते. त्यामुळे या ठिकाणी उकिरड्याचे स्वरूप आले शिवाय इमारत खचल्याने इमारतीत पावसाळ्यात पाणी साचून राहत असल्याने इमारत केव्हाही कोसळण्याची भीती निर्माण झाली होती.
त्यामुळे पन्नास वर्षांची मोडकळीस आलेली कार्यालयाची इमारत बांधण्याची गरज असताना याकडे दुर्लक्ष करीत डब्बरचे कंपाउंड वॉल तयार केले जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दहा वर्षांत दुसऱ्यांदा असे कंपाउंड बांधले जात आहे, त्यामुळे गुत्तेदार पोसण्यासाठी शासनाचे लाखो रुपये पाण्यात घालण्याचा हा प्रकार असल्याचे बोलले जाते. इमारत चांगली नसताना कंपाउंड वॉल कशासाठी असा प्रश्न उपस्थित होत असून आहे. अगोदर इमारत बांधणे गरजेचे असताना पुन्हा एकदा निकृष्ट दर्जाचे कंपाउंड बांधले जात आहे याकडे वरिष्ठांनी लक्ष घालणे गरजेचे आहे.