

Narcotics pills selling racket destroyed in Beed
बीड, पुढारी वृत्तसेवा : शहरात अल्फ्राझोलम गोळ्या आणि कोडीनयुक्त औषधांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या दोघांना बीड शहर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये मेडिकल दुकान चालकासह त्याला गोळ्यांचा पुरवठा करणाऱ्या तरुणाचा समावेश आहे. यापूर्वी या प्रकरणी चार जण गजाआड आहेत. यामुळे बीडमध्ये नशेच्या गोळ्या विक्री करणारे रॅकेट उध्वस्त झाले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून बीड शहरात नशेचे प्रमाण वाढल्याने पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी अशा प्रकरणांवर कठोर कारवाईचे आदेश दिले होते. याअंतर्गत दोन महिनेपूर्वी पोलिसांनी एका रॅकेटचा पर्दाफाश करून सुमारे साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता.
या प्रकरणात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, चौघे आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ, सहाय्यक निरीक्षक बाबा राठोड, अंमलदार सचिन अलगट, संजय राठोड, गहिनीनाथ बावनकर, राम पवार यांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास बीड शहर पोलीस करत आहेत.
या गुन्ह्याच्या तपासादरम्यान, शेख फारुक शेख आरेफ (रा. इस्मालमपूरा) याने या गोळ्यांची विक्री केली असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्या चौकशीतून इनामदार मोहम्मद तारीखोद्दीन मोहम्मद नुरुद्दीन याने गोळ्यांचा पुरवठा केल्याची माहिती मिळाली. त्यालाही ताब्यात घेण्यात आले.