

Mahadev Munde murder case murder was extremely brutal; Bala Bangar claims
बीड, पुढारी वृत्तसेवा : परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांची हत्या पाळत ठेवून करण्यात आली. त्यांना एकटे गाठून धारदार शस्त्राचे वार करण्यात आले. मारेकऱ्यांनी आधी त्यांच्या पायावर वार केले, नंतर मानेवर वार केल्याचा दावा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळा बांगर यांनी केला. तसेच या प्रकरणात गोट्या गीतेसह इतरांना ताब्यात घ्या, सर्व सत्य समोर येईल, अशी मागणीही बाळा बांगर यांनी केली.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा वाल्मीक कराडचे एकेकाळचे सहकारी बाळा बांगर यांनी बुधवारी (दि.२३) बीड येथील शासकीय विश्रामगृहात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणातील छायाचित्र माध्यमांसमोर आणली. महादेव मुंडे यांचा खून हा पाळत ठेवून करण्यात आला.
अतिशय क्रूरपणे त्यांच्या गळ्यावर, चेहऱ्यावर वार करण्यात आले. हे शस्त्र परराज्यातून आणण्यात आले होते. सर्वात आधी महादेव मुंडे यांच्या पायावर वार करण्यात आले. त्यामुळे ते ओरडू लागताच त्यांच्या गळ्यावर, गालावर वार करण्यात आले. शरीरावर लहान-मोठे एकवीस वार आहेत. या प्रकरणात ज्ञानेश्वरीताईंनी संशयित आरोपींची नावे घेतली आहेत. त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी बाळा बांगर यांनी केली आहे.
महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणात तपासाकरिता आयपीएस अधिकारी असायला हवा. आता पोलिस अधीक्षकांनी याकरिता विशेष पथक नियुक्त केले आहे. परंतु यामध्ये सर्व स्थानिक अधिकारी आहेत. आजही बीड पोलिस दलासह इतर विभागांत वाल्मीक कराडने आणलेले अनेक लोक कार्यरत असून, त्यांच्यामुळे अनेक गोष्टी विलंबाने होतात. या तपास पथकाच्या प्रमुखपदी आयपीएस अधिकारी नियुक्त करावा, अशी मागणी बांगर यांनी केली.
महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणावेळी अनेकांनी हा प्रकार पाहिला, परंतु त्या ठिकाणी असलेल्या पोलिसांनीच या लोकांना हाकलून लावल्याचा दावा बाळा बांगर यांनी केला. तसेच तपासात विलंब लावण्यातही काही पोलिस अधिकाऱ्यांचा हात होता. त्या पोलिस अधिकाऱ्यांची नावेही जाहीर करणार असल्याचे बाळा बांगर यांनी सांगितले. मुंडे यांच्या शरीरावर कशा पद्धतीने वार करण्यात आले होते, याचे छायाचित्र बाळा बांगर यांनी पत्रकार परिषदेतून समोर आणले.