

परळी : महादेव मुंडे यांची निघृण हत्या होऊन तब्बल २० महिने उलटून गेले, पण अजूनही मारेकरी फरारच आहेत ! पोलिस यंत्रणा झोपली आहे का? की दबावाखाली काम करत आहे? असा संतप्त सवाल परळीतील नागरिकांपासून ते थेट पीडित कुटुंबीयांपर्यंत सर्वत्र विचारला जात आहे. आता या निष्क्रियतेला कंटाळून पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी २५ जुलै रोजी परळीत रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
२० ऑक्टोबर २०२३ रोजी परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांची हत्या झाली. हा गुन्हा घडून जवळपास २० महिने उलटले, तरीदेखील गुन्हेगार मोकाट फिरत आहेत. इतक्या कालावधीत एकाही मारेकऱ्याचा ठावठिकाणा लागला नाही की पोलिस आरोपींचा बचाव करत आहेत असा आरोप करून पोलिसांकडून हे प्रकरण मागील वीस महिन्यांपासून दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप मुंडे यांनी केला आहे. या हत्येनंतर अनेकदा पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी जीव धोक्यात घालून उपोषणं, निदर्शन केली, मात्र पोलिस खातं जागं झालं नाही.
आता त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, २५ जुलै रोजी रस्त्यावर उतरलोच पाहिजे! आम्ही आता गप्प बसणार नाही. आमच्या मुलांचे भवितव्य, आमचे अस्तित्व याच्यावरच प्रश्नचिन्ह आहे.
१९६ जणांची चौकशी, २८६ मोबाईल क्रमांकांची तपासणी, १५० हून अधिक कॉल रेकॉर्डची पाहणी करून दिगीतल डाटा पोलिसांनी हस्तगत केला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी गुन्हा अन्वेषण विभागाचे पी.आय. शिवाजी बंटेवाड यांच्या नेतृत्वाखाली दोन अधिकारी व सात कर्मचारी अशा ९ जणांचे विशेष पथक नेमले आहे. मात्र आतापर्यंतच्या तपासातून काही ठोस निष्कर्ष समोर आलेला नाही. महादेव मुंडे हत्या प्रकरण आता केवळ एक तपास प्रकरण न राहता, सामान्य जनतेच्या असुरक्षिततेचा प्रश्न झाला असून यासाठीच आता २५ जुलैला होणाऱ्या आंदोलनाने या प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.
कालच मराठा आरक्षण आंदोलनचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी महादेव मुंडे यांच्या घरी जाऊन ज्ञानेश्वरी मुंडे व सतीश फड यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यांनी याप्रकरणात एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली होती. या मागणीनंतर पोलिस अधीक्षक नवनीत कांवत यांनी या प्रकरणात शेवटी विशेष तपास पथकाची घोषणा केली आहे.