

रेणापूर (बीड) : विठ्ठल कटके
सध्या बाजारात मुगाच्या हिरव्या कोवळ्या ओल्या शेंगा विक्रीसाठी येत आहेत. या शेंगाचा भाव प्रति किलो शंभर ते सव्वाशे रुपये असुन बाजारात इतर भाज्यांचे दर वाढल्यामुळे गृहणी चवदार व खमंग आमटी करण्यासाठी ओल्या मुगाच्या शेंगाला अधिक पसंती देत आहेत. शेंगा वाळवून मुग विकण्यापेक्षा ओल्या शेंगा विकने शेतकर्यांनाही परवडत आहे.
रेणापूर तालुक्यात मुगाचे - 472 हेक्टर क्षेत्र आहे. मागील वर्षापेक्षा या वर्षी मृग नक्षत्रात चांगला पाऊस पडला त्यामुळे खरीपाच्या पेरण्या वेळेवर झाल्या त्यात मुगाची 334 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पेरणीपासुनच मुगाला पोषक वातावरण असल्यामुळे बहुतांश शेतकर्यांच्या शेतावर मुगाच्या हिरव्या ओल्या शेंगा लकडुन गेलेल्या आहेत. वाळलेल्या मुगापेक्षा ओल्या शेंगांना चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकरी बाजारात ओल्या शेंगा विक्रिला आनित आहेत. हेक्टरी 3 ते 11 क्विंटल उत्पादन देणार्या मुगाच्या सात ते आठ जाती आहेत. भर पावसाळ्यात काढणीला येणारे हे पीक आहे.
पुर्वी मुगाच्या काढणीसाठी पावसात मोठी कसरत करावी लागत असे मुगाची वेचणी झाल्यानंतर वाळलेल्या शेंगा डोक्यावर किंवा बैलगाडीने घरीच आणल्या जात होत्या. सततच्या पावसामुळे बहुतांश करून मुगाच्या राशी घरीच कराव्या लागत असत. बाजारात इतर भाज्यांचे दर वाढल्यामुळे गृहीणी मुगाच्या ओल्या शेंगा खरेदी करून त्याची चवदार आमटी बनवित आहेत. आमटी बरोबरच ओल्या मुगापासून विविध प्रकारचे खाद्यपदार्थहि तयार केले जात आहेत. वाळलेल्या मुगापेक्षा ओल्या शेंगांना बाजारात प्रति किलो शंभर ते सव्वाशे रुपये भाव मिळत असल्यामुळे बहुतांश शेतकरी बाजारात ओल्या शेंगा विकताना दिसत आहेत. वाळलेल्या मुगाला प्रति क्विंटल आठ ते साडेआठ हजार रुपये भाव मिळत आहे तर ओल्या शेंगा दहा ते बारा हजार रुपये प्रति क्विंटल विकत असल्याने शेतकर्यांचा ओल्या शेंगा विकण्याकडे कल वाढत आहे.
मुगाच्या डाळीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने मुगदाळ पचनासाठी हलकी असते. या डाळीचे नियमीत सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते , वजन नियंत्रित राहते. सध्या बाजारात मुगाच्या कोवळ्या हिरव्या शेंगा विक्रीला येत आहेत. मुगाच्या डाळीचे जसे आरोग्याला विविध फायदे आहेत त्यातून जी जीवनसत्त्वे मिळतात. त्याच प्रमाणे मुगाच्या ओल्या शेंगाही शरीसाठी पौष्टीक असतात. ओल्या मुगाची आमटी चवदार लागते.