

हिंगोली: शहरातील खवय्यांसाठी आवडता पदार्थ असलेल्या खिचडी-मुगाच्या भज्याच्या दरात २५ टक्क्याने वाढ करण्याचा निर्णय हॉटेल असोसिएशनच्या वतीने घेण्यात आला आहे. त्यामुळे खवय्यांच्या खिशाला चांगलाच भुर्दंड बसतो आहे. गोड तेलासह सर्वच साहित्याच्या दरात वाढ झाल्याने खिचडी-भज्याच्या दरात वाढ करण्यात आल्याचा दावा हॉटेल असोसिएशनच्या वतीने करण्यात आला आहे.
हिंगोली शहरात जवळपास २० ते २५ खिचडी व भजे व्यावसायिक आहेत. शहरात दररोज १० क्विंटल खिचडी व ८ क्विंटल भज्यांची विक्री होते. हिंगोलीतील खवय्यांसाठी खिचडी-भजे आवडता पदार्थ आहे. हिंगोलीत येणारा कोणताही व्यक्ती खिचडी-भजे खालल्याशिवाय जात नाही. परंतु खिचडी-भज्यांच्या दरात २५ टक्क्याने वाढ करण्यात आल्याने ग्राहकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. पूर्वी खिचडी व भजे १५ रुपये दराने मिळत होते. आता त्यामध्ये ५ रुपयांची वाढ करण्यात आल्याने खिचडीची प्रति प्लेट २० रूपये व भजे प्रति ५० ग्रॅम २० रुपये तसेच जिलेबी व इतर खाद्यपदार्थाच्या दरातही वाढ करण्यात आली आहे.
सोयाबीनच्या तेलाच्या दरात मोठी वाढ झाल्याने हॉटेल व्यावसायिकांनी पदार्थाच्या किमती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. महिन्याभरापूर्वी १५ लिटर गोडतेलाचा डब्बा १४०० ते १५०० रुपयांना मिळत होता. आता तो थेट २१०० ते २२०० रुपयांना विकत घ्यावा लागत आहे. गोडतेलाबरोबरच मूग डाळीच्या दरातही ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या मूग डाळीला १३० रुपये मोजावे लागत आहेत. डाळीबरोबरच भाजीपाल्याच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. लसण ३०० रुपये, कांदा ४० रुपये, टोमॅटो ८० रुपये, मिरची ६० रुपये, कोथिंबीर १२० रुपये किलो दराने विकत घ्यावा लागत आहे. गोडतेलासह खिचडी व भज्यांसाठी लागणाऱ्या सर्वच साहित्याचे दर वाढल्याने खिचडी- भज्याच्या दरात वाढ झाली आहे.