Minor Kidnapping Case |आंतरजातीय विवाहासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण; केज तालुक्यात खळबळ

Minor Kidnapping Case | तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
kidnapping
kidnappingPudhari
Published on
Updated on
Summary
  1. केज तालुक्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण प्रकरण

  2. आंतरजातीय विवाहासाठी मुलीला पळवून नेल्याचा संशय

  3. आई-वडील घरी नसताना घटना घडली

  4. संशयित सागर गरडेविरोधात गुन्हा दाखल

  5. पोलिसांकडून शोधमोहीम सुरू

केज : तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आंतरजातीय विवाह करण्याच्या उद्देशानेच ही मुलगी पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

kidnapping
Water Crisis | कासारी खोऱ्यात पाणी टंचाईचे सावट! कासारी धरणात केवळ 0.80 टीएमसी साठा शिल्लक

मिळालेल्या माहितीनुसार, केज तालुक्यातील एका गावातील ही अल्पवयीन मुलगी शेजारच्या तालुक्यात इयत्ता अकरावीमध्ये शिक्षण घेत आहे. दिनांक ४ मे रोजी सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास तिचे आई-वडील आजारी असलेल्या आजीला भेटण्यासाठी गावाबाहेर गेले होते. संध्याकाळी परत घरी आल्यानंतर मुलगी घरात नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.

घरात शोध घेतला असता कपाट उघडे असून त्यातील मुलीचे कपडे आणि बॅगही गायब असल्याचे दिसून आले. त्यामुळे मुलगी स्वतःहून घर सोडून गेली की तिला कोणी पळवून नेले, याबाबत संशय निर्माण झाला.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुलीने आपल्या आईकडे सागर शंकर गरडे (रा. उंदरी) याच्यासोबत लग्न लावून देण्याची मागणी केली होती. मात्र तो वेगळ्या जातीचा असल्याने आईने या नात्याला विरोध करत मुलीला त्याच्यापासून दूर राहण्यास सांगितले होते. या पार्श्वभूमीवर सागर गरडे यानेच मुलीला पळवून नेल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.

घटनेनंतर मुलीच्या कुटुंबीयांनी सागर गरडे यांच्या घरी जाऊन चौकशी केली असता घरात कोणीही नसल्याचे दिसून आले. तसेच संबंधितांचे मोबाईल फोनही बंद असल्याने संशय अधिकच बळावला आहे.

kidnapping
Selu PWD Protest | सेलू-परभणी रोडवर जीवघेणा प्रवास; संतप्त नागरिकांचा प्रशासनाला इशारा

या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून सागर गरडे याच्याविरोधात युसुफवडगाव पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून पोलिसांकडून मुलीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news