

सेलू (प्रतिनिधी): परतूर-मानवत या राज्य महामार्गावरील सेलू शहरातून जाणाऱ्या रस्त्यावर गतिरोधक बसविण्याच्या मागणीसाठी आज संतप्त नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग, सेलू येथे जोरदार ठिय्या आंदोलन केले. गेल्या अनेक दिवसांपासून या मार्गावर होणारे अपघात आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता.
अपघातांचे सत्र आणि प्रशासकीय दुर्लक्ष
सेलू शहरातील सातोना रोड ते परभणी रोड हा मार्ग अत्यंत रहदारीचा आहे. या परिसरात शाळा, महाविद्यालये, हॉटेल्स, दुकाने आणि मोठी नागरी वस्ती आहे. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते वालूर नाका या दरम्यानचे दोन्ही मार्ग सिमेंटचे झाल्यापासून वाहनधारकांचा वेग प्रचंड वाढला आहे. भरधाव वाहनांमुळे या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले असून, यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर काही जण कायमचे अपंग झाले आहेत.
या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार निवेदने देऊन आणि तोंडी विनंती करूनही गतिरोधक बसवण्याबाबत कोणतीही हालचाल झाली नव्हती. प्रशासनाच्या या उदासीनतेचा निषेध करण्यासाठी आज नागरिकांनी बांधकाम विभागाच्या कार्यालयातच ठिय्या मांडला.
आठ दिवसांत गतिरोधक बसवण्याचे आश्वासन
जवळपास एक तास चाललेल्या या आंदोलनानंतर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता माने यांनी आंदोलकांशी चर्चा केली. त्यांनी लेखी आश्वासन दिले की, येत्या आठ दिवसांच्या आत या मुख्य मार्गावर तसेच छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते वालूर रोड या दरम्यान आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक बसविण्यात येतील. हे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर नागरिकांनी आपले आंदोलन मागे घेतले.
आंदोलनातील सहभाग
या आंदोलनात जयसिंग शेळके, शिवशंकर मोरे, संतोष निर्वळ, गोविंद हरणे, भरत शेरे, पवन नाईक, समाधान निर्वळ, नितीन होगे, वैभव शेरे, राजू नाईक, मुंजा गाडेकर, गणेश शेवाळे, अक्षय जोशी, विराट तिर्थे, माऊली लेवडे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.