

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातल्या साळेगावमधील शेख अतिक यांचं आयुष्य खरंच प्रेरणादायी आहे. शिक्षण नसल्यामुळे लहानपणापासूनच कामधंद्यासाठी झटणाऱ्या या तरुणाने प्रथम जीपवर क्लिनर म्हणून काम केलं. काही महिन्यांतच ड्रायव्हिंग शिकून तो जीपचालक झाला. पण आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं, स्वतःचं काहीतरी उभं करायचं या ध्यासामुळे अतिकने ड्रायव्हिंग सोडून शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांच्या आयुष्यातला सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरला.
ड्रायव्हिंग सोडल्यानंतर त्यांनी वडिलोपार्जित शेती आधुनिक पद्धतीने करण्याचा निश्चय केला. नवीन तंत्रज्ञान, मल्चिंग, ठिबक, अचूक खत व्यवस्थापन आणि बाजारपेठेचा अभ्यास या सर्वांचा एकत्रित वापर करत अतिकने झेंडू लागवडीचा प्रयोग सुरू केला. यावर्षी त्यांनी तब्बल तीन एकर क्षेत्रावर ३० हजार झेंडूची रोपे लावली. लागवडीपासून केवळ दोन महिन्यांत पहिली तोडणी सुरू झाली आणि दिवाळी तसेच लग्नसराईचा हंगाम सुरू होताच झेंडूला बाजारात मोठी मागणी मिळाली.
कल्याण मार्केटमध्ये झेंडूच्या फुलांना 80 हजार रुपये प्रति टन असा मिळणारा जबरदस्त भाव अतिकसाठी सुवर्णसंधी ठरला. त्यांच्या शेतातून एकरी 6 ते 7 टन फुलं निघत आहेत. तोडणीचा कालावधीही तब्बल दोन ते अडीच महिने असल्याने उत्पन्न स्थिर राहते. हिवाळ्यात झेंडूवर रोग आणि किडीचा प्रादुर्भाव कमी दिसतो हेही त्यांच्या पथ्यावर पडलं.
तिन्ही एकर मिळून अतिकना 18 ते 20 लाख रुपये उत्पन्न मिळणार आहे, तर खर्च वजा जाता त्यांना 15 ते 17 लाख रुपये निव्वळ नफा हातात येणार आहे. केवळ पाच महिन्यांत इतकं मोठं उत्पन्न मिळणं एखाद्या शेतकऱ्यासाठी आयुष्य बदलून टाकणारं आहे.
कलम: 90,000
मल्चिंग: 1,50,000
खत व फवारणी: ५०,०००
मजूर व आंतर मशागत: ५०,०००
इतर खर्च: १०,०००
अतिक फक्त स्वतः शेती करत नाही, तर आसपासच्या शेतकऱ्यांनाही मार्गदर्शन करतो. ढोबळी मिरची, टोमॅटो, खर्बूज, झेंडू, कांदा अशा विविध पिकांवर तो प्रयोग करतो आणि ती माहिती शेतकरी मित्रांना देतो. “सर्वांनी एकमेकांना मदत केली तर सगळ्यांचं उत्पन्न वाढतं,” असं अतिक म्हणतो.
कृषी विभागाचे सहाय्यक अधिकारी कमलाकर राऊतही अतिकच्या मेहनतीचे कौतुक करतात. “आधुनिक पद्धती, तंत्रज्ञान आणि बाजाराचा अभ्यास केल्यास शेतकऱ्यांना मोठं उत्पन्न मिळू शकतं,” असे राऊत सांगतात.
अतिक शेख यांच्या चिकाटीची ही कहाणी शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने प्रेरणा देणारी आहे. साध्या क्लिनरपासून आधुनिक प्रगत शेतकरी होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास मेहनत, शिस्त आणि सातत्य याचं उत्तम उदाहरण आहे.