

Marathwada farmers loss due to rain
बीड: मराठवाड्यासह बीड जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे सरकारने तातडीने ठोस मदत करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांनी केली आहे. ते शुक्रवारी (दि.२६) बीड जिल्ह्यातील अतिवृष्टी झालेल्या भागाचा दौरा करण्यासाठी आले होते. यावेळी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
यावेळी जयंत पाटील म्हणाले की, अतिवृष्टीमुळे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. मराठवाड्यात बहुतेक ठिकाणी सामान्य अतिवृष्टी झाली नसून सर्वच गावे पाण्याखाली गेली आहेत. जनावरे वाहून गेली आहेत. काही जनावरे जागेवरच दगावली आहेत.शेळ्या मेंढ्या वाहून गेल्या आहेत. घरामध्ये पाणी शिरल्याने सर्व वस्तू साधने वाहून गेली आहेत. घरे वाहून गेली आहेत. त्यामुळे शासनाने चार पाऊल पुढे येऊन शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करावी. शेतकऱ्यांच्या शिवारात उभे असलेले सोनेरी पीक काही क्षणांत नष्ट झाले. शेतकरी डोळ्यांत अश्रू घेऊन आपला संसार उद्ध्वस्त होताना बघत आहे. सरकारने शेतकऱ्यांना पंचनाम्याच्या प्रक्रियेत अडकवून अधिक मानसिक छळ देण्यापेक्षा सरसकट नुकसान भरपाई द्यावी. आज शेतकरी संकटात आहे. सरकारने केवळ घोषणा न करता तातडीने निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा, कारण शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही दिवसांपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे एकरी किमान ५० हजार रुपये इतकी थेट मदत तातडीने दिली पाहिजे. सरकारने हप्ते पडून २५ हजार रुपयांचा पहिला हप्ता दिला पाहिजे.
अतिवृष्टीमुळे शेतीसह जनावरांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात जनावरे वाहून गेली आहे. जनावरांच्या किंमती वाढलेल्या आहेत. बाजारात सध्या ०१ लाख २० हजार पर्यंत गायी म्हशींची किंमत आहे. सरकारने किमान ६० ते ७० हजार रुपये गायी म्हशीं ज्या वाहून गेल्या आहेत त्याची नुकसान भरपाई द्यावी, शेळ्या मेंढ्या साठी १० हजार रुपये द्यावेत.
अनेक भागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या आहेत. जमिनी खरडून गेल्या आहेत. त्यांना शासनाने एकरी ३० हजार रुपयांची मदत द्यावी. यासोबतच नदी पात्रालगत संरक्षण भिंत बांधून द्यावी, अशी मागणी आ. जयंत पाटील यांनी केली आहे.