

Marathwada flood farmers affected soybean crop damage news
मनोज गव्हाणे
नेकनूर: बुधवार, गुरुवार दोन दिवस थांबलेला पाऊस शुक्रवारी (दि.26) पहाटे पुन्हा सुरू झाल्याने दोन दिवस चिखल तुडवत काढलेल्या सोयाबीनचा चिखल झाला. आता मात्र काहीच पदरात राहणार नसल्याने शेतकरी चिंतेत बुडाला आहे. शेतीचे प्रचंड नुकसान असताना महसूलचा ललाटी कारभार काही ठिकाणी शेतकऱ्यांची नियमावर बोट ठेवत अडवणूक करत आहे.
यावर्षी सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने आल्याने शेतकऱ्याच्या उत्पन्नाच्या आशा वाढल्या असतानाच पंधरा दिवसापासून पाऊस लागून राहिला आणि होत्याच नव्हतं झालं. पिके, जमिनी वाहून गेल्या. दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने थोड्याफार प्रमाणात सोयाबीन हाती लागेल, म्हणून शेतकऱ्यांनी चिखलात काढणीला सुरुवात केली. मात्र यावरही शुक्रवारी पहाटेपासून पडणाऱ्या पावसामुळे पाणी पडले. काढलेल्या सोयाबीनचा चिखल झाला. बीड तालुक्यातील लिंबागणेश, नेकनूरसह केज तालुक्यातील अनेक गावात शेतकऱ्याची दोन दिवसाची सोयाबीन काढण्याची लगबग पाण्यात गेली. आता शेतकऱ्यांना सावरायला मोठ्या मदतीची गरज असताना अजून मदतीची प्रतीक्षा कायम आहे.
अतिवृष्टीने तसेच मांजरा नदीच्या पाण्याने बोरगाव येथील शेतकरी तुकाराम गव्हाणे यांच्या दोन एकर क्षेत्रातील ऊस खोदून वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले. मात्र तलाठी यांनी ऊसाला मदत नसल्याचे कारण देत पंचनामा करण्यास नकार दिल्याचे शेतकऱ्याने सांगितले. प्रशासनाने शेतकऱ्यांना दिलासा देत मदतीसाठी प्रयत्न करणे गरजेचे असताना ललाटी कारभार नियमावर बोट ठेवत असल्याने शेतकऱ्यात संताप वाढतो आहे.