

बीड : आरक्षण कसे देणार हे माझ्या मराठा सामाजाला माहिती आहे, ते तुम्हाला कळणार नाही. आरक्षण काय? आणि लढा टिकवणे काय असते? तुम्हाला काय माहीत, तुम्हाला अस्तित्व कसे संपवायचे, हे माहीत आहे आणि अस्तित्व कसे टिकवायचे हे मला माहीत आहे, अशा शब्दांत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे.
रेणापूर येथील जाहीर प्रचारसभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका करताना आरक्षण कसे देणार हे सांगा, असा सवाल केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना जरांगे म्हणाले, राज ठाकरे यांनी आरक्षणाच्या प्रश्नात पडू नये, त्यांना मानणारा वर्ग आमचा (मराठा) आहे. मराठा समाजाचा रोष अंगावर घेऊ नये, अशी माझी त्यांना सूचना आहे. आरक्षण कसे मिळते, याचे उत्तर मी पूर्वीच दिले आहे. तुम्हाला ते माहीत नाही, तुम्ही त्यावेळी झोपेत होता, असा खरमरीत टोला जरांगे यांनी राज ठाकरे यांना लगावला. मराठा आरक्षणाला विरोध करणार्यांना या विधानसभा निवडणुकीत पाडा, असे आवाहन त्यांनी केले.