

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाची जेथे ताकद आहे, जेथे उमेदवार निवडून येऊ शकतो, तेथे उमेदवार उभे करू. जेथे उमेदवार उभे करणार नाही, त्याठिकाणी पाडापाडी करून मराठा समाजाची ताकद दाखविण्याची घोषणा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी केली. आपले सर्व उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात उतरतील, आरक्षित जागेवर उमेदवार उभे न करता जे बाँडवर लिहून देतील त्यांच्या पाठीशी समाज उभा राहील, असे त्यांनी सांगितले. ( Manoj Jarange Patil )
उमेदवार उभे करावयाचे की पाडावयाचे यावर विचार करण्यासाठी जरांगे ( Manoj Jarange Patil ) यांनी रविवारी अंतरवाली येथे समाजाची बैठक बोलाविली होती. या बैठकीत त्यांनी निवडून येण्याची शक्यता असणार्या जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचे स्पष्ट केले सगळ्यांची भावना उमेदवार उभे करण्याची आहे, तरी जात अडचणीत येईल असे करता येणार नाही. समाजाचा चौफेर विचार करता सावधगिरीची भूमिका घ्यावी लागेल. जातीची समीकरणे जुळवून जेथे क्षमता आहे तेथे मराठा उमेदवारांना उभे केले जाईल.
एससी, एसटी राखीव मतदार संघ आहेत तिथे आमच्या विचाराच्या उमेदवाराला मतदान करणार आहोत. त्या उमेदवाराने बाँडवर आमच्या मागण्यांशी सहमत असल्याचे लिहून द्यावे. सध्या सगळ्यांना अर्ज भरण्यासाठी सांगितले आहे. अर्ज मागे घेताना उमेदवारांना कळवले जाईल. कुणाचा अर्ज कायम ठेवायचा आणि कुणी काढायचा हे जाहीर केले जाईल. ज्याने सांगूनही अर्ज मागे घेतला नाही, त्याने पैसे खाल्ले असे जाहीर केले जाईल, असे ते म्हणाले. अर्ज माघारी घेण्याच्या तारखेआधी राज्यातील किती मतदारसंघ लढवायचे आणि कोणत्या ठिकाणी कोण माघार घेणार हे मी जाहीर करणार आहे. मला निवडणूक महत्त्वाची नाही माझ्या समाजाची शान महत्त्वाची आहे. राज्यातील कोणत्या मतदारसंघात मराठा समाजाचा उमेदवार निवडून येऊ शकतो हे समाजाच्या लोकांनी अंतरवालीत येऊन मला सांगावे, त्याचा विचार करू. गावात मतदान फुटू देऊ नका. वाद करू नका, मतदान बूथ कॅपचर करू देऊ नका. आम्ही डोके लावून यांचा भुगा करणार, असा इशारा जरांगे यांनी दिला.
आम्हाला काही ठिकाणी उमेदवार पाडावे लागणार आहेत. आमच्याकडून अपक्ष म्हणून निवडून आलेला आमदार पळून गेला किंवा कुणाला जाऊन मॅनेज झाला तर त्याला बघून घेऊ, असे ते म्हणाले. फडणवीस यांनी मराठा संपवण्याचा घाट घालायला नको होता. आमच्या वेदना त्यांनी वाढविल्या, अशी टीका जरांगे यांनी केली. मराठ्यांची मान आजपर्यंत कधीही खाली होऊ दिली नाही. त्यामुळे मराठा समाजाने आपली मान खाली जाऊ देऊ नये, समाजाची उंची कायम ठेवा. काही झाले तरी मराठा समाज संपला नाही पाहिजे, असेही ते म्हणाले. निवडणूक येतील जातील आपल्याला हट्ट नाही करायचा. निवडणुकीसाठी समाज तुटला नाही पाहिजे. समाज हरवू देऊ नका, हरला तर दोघांचेही पाय गळतील. मला आणि समाजाला उघडे पाडले तर जात संपेल, असे ते म्हणाले.
मुस्लिम, एससी आणि एसटीच्या जागा आहेत, तिथे जो आपल्या विचाराचा आहे, तिथे लाखभर मतदान देऊन त्या उमेदवाराला निवडून द्यायचे, असे जरांगे यांनी स्पष्ट केले. कुठे मराठ्यांची ताकद आहे, कुठे मुस्लिमांची ताकद आहे ते गणित पाहणे गरजेचे आहे. कारण ते समीकरण जुळवणेही महत्त्वाचे आहे. मी समीकरण जुळवतोय. नाही जुळले तर अवघड आहे, असेही त्यांनी सांगितले.