कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळू नये हीच राज्य सरकारची भूमिका आहे. त्यासाठीच यावेळी सरकारने आपल्याला चारही बाजूंनी घेरले आहे. सत्ताधारी आणि विरोधक माझ्या मागे लागले आहेत, असा आरोप संघर्षयोद्धा मनोज जरांगे यांनी केला.
परंतु गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी माझा लढा सुरू असून कोणत्याही परिस्थितीत ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळवून देणारच, असा निर्धारही त्यांनी केला. सकल मराठा समाजाच्या वतीने कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित जाहीर सभेत जरांगे बोलत होते.
ते म्हणाले, मराठा आरक्षणाचा प्रश्न आता अंतिम टप्प्यात आला आहे. फक्त सगेसोयरे याची अंमलबजावणी राहिली आहे. ती झाली की, मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे. मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मी थांबणार नाही. सरकारला काय ताकद लावायची ती लावू द्या, असा इशारा देऊन जरांगे म्हणाले, गोरगरीब मराठ्यांसाठी आरक्षण पाहिजे. त्यासाठी हात जोडून विनंती करतो की, आरक्षण द्या.
अन्यथा लोकसभेला पाडले तसे विधानसभेला पुन्हा एकदा पाडावे लागेल. त्याशिवाय मराठा समाजाला पर्याय नाही. काही आमदारांच्या टोळ्या मला बदनाम करण्यासाठी सोडल्या आहेत. तसेच आपल्याविरोधात आंदोलन करण्यासाठी मराठ्यांच्याच संघटना फोडल्या, आहेत. मराठ्यांबरोबरच मुस्लिम आणि धनगरांनाही आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असेही जरांगे यांनी सांगितले.
मनोज जरांगे यांनी १७ मिनिटे उभे राहून भाषण केले. या भाषणात त्यांनी आपले शरीर खूप थकल्याचे सांगितले. शेवटच्या उपोषणाचा खूप त्रास झाल्याचे सांगून ते म्हणाले, आज सकाळीसुद्धा सलाईन लावूनच बाहेर पडलो. डॉक्टरांना सलाईन लावण्यासाठी शिर सापडत नव्हती. शरीरातील सर्व शिरांत सलाईनसाठी सुई टोचल्या आहेत. त्यामुळे शरीरातील सर्व शिरा पंक्चर झाल्या आहेत.