

Man arrested for kidnapping minor girl
केज, पुढारी वृत्तसेवा : केज तालुक्यातील काशिदवाडी येथून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून थेट तेलंगणा राज्य गाठणाऱ्या आरोपीला तब्बल तीन महिन्यांच्या तपासानंतर पोलिसांनी मुलीसह ताब्यात घेतले आहे. या घटनेच्या नैराश्यातून पीडित मुलीच्या वडिलांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याने परिसरातही खळबळ उडाली होती.
केज तालुक्यातील काशिदवाडी येथील १६ वर्षीय मुलगी अंबाजोगाई येथे १२ वी मध्ये शिक्षण घेत होती. ३० मे रोजी रात्री जेवणानंतर कुटुंबातील सर्वजण झोपले असताना ३१ मेच्या मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने मुलीचे अपहरण केले. पीडित मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. २८३/२०२५ नुसार भा.दं.सं. १३७ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, तीन महिने उलटूनही आरोपी व मुलीचा ठावठिकाणा लागत नसल्याने कुटुंबीय चिंता व नैराश्यात होते.
पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उमेश निकम यांनी संशयित अप हरणकर्ता हर्षद बालाजी जाधवर (वय २०) याच्यावर लक्ष केंद्रित केले. गुप्त व तांत्रिक तपासाद्वारे नातेवाईकांचे फोन कॉल रेकॉर्ड (सीडीआर) तपासले असता आरोपीचे लोकेशन तेलंगणा राज्यातील खम्मम जिल्ह्यातील मोडीगोंडा येथे असल्याचे स्पष्ट झाले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीने पथक तयार करून पो. उपनिरीक्षक उमेश निकम, पो. हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत काळकुटे, पो. नाईक किशोर गोरे आणि महिला पो. कॉन्स्टेबल जयश्री भालेराव यांच्या मदतीने तेलंगणातील स्थानिक पोलिसांसोबत कारवाई करून आरोपी व पीडित मुलीला ताब्यात घेण्यात आले.
मुलीच्या अपहरणामुळे तीव्र मानसिक ताणतणावाखाली असलेल्या मुलीच्या वडिलांनी ३ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. सुदैवाने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केल्याने त्यांचे प्राण वाचले.
या घटनेमुळे परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे. आरोपी हर्षद जाधवर याच्या विरुद्ध दाखल गुन्ह्याचा तपास पिंक पथकाकडून वेगाने सुरू असून पोलिसांकडून मुलीचे जबाबही नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेने अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
केज पोलिसांनी हर्षद जाधवर याच्यावर बलात्कार आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून तपासाची जबाबदारी पिंक पथकाचे पो. उपनिरीक्षक प्रकाश शेळके यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे, तर अल्पवयीन मुलीची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे.