

परळी वैजनाथ : परळी तालुक्यातील डाबी गावाजवळील शेतातील घरात एका ३६ वर्षीय गृहिणीचा धारदार शस्त्राने वार केलेला रक्तरंजित मृतदेह आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृत महिलेचे नाव शोभा तुकाराम मुंडे (वय अंदाजे ३६) असे असून तिच्या मृतदेहावर गंभीर जखमा आढळल्या आहेत.
डाबी गावाजवळ राखेच्या तळ्याशेजारी तुकाराम मुंडे यांचे कुटुंबीय आखाड्यावर राहतात. आज सकाळी त्यांच्या घरात शोभा मुंडे यांचा मृतदेह पडलेला दिसला. जखमांचे स्वरूप पाहता ही हत्या असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच परळी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जागेची पाहणी केली व पंचनामा केला.
मात्र या प्रकरणी अद्याप कोणत्याही नातेवाईकांनी पोलिसांकडे फिर्याद दिलेली नाही. काही काळ गावकरी व नातेवाईकांनी आरोपीचा शोध घ्यावा, त्यानंतरच मृतदेह हलवावा, अशी भूमिका घेतल्याने घटनास्थळी तणावाचे वातावरण होते.
दरम्यान, मृत महिलेचा पती तुकाराम मुंडे घटनास्थळावरून गायब असल्याने पती-पत्नीतील वादातून हा प्रकार घडला असावा का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. काही नातेवाईकांनी एक दीड वर्षांपूर्वी पती-पत्नीतील वाद मिटल्याचे सांगितले असून ते पुन्हा एकत्र राहत होते. तरीही पतीच संशयित असू शकतो, अशी प्राथमिक शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. ग्रामीण पोलीस याप्रकरणी सखोल तपास करत असून अधिकृत फिर्याद येण्याची प्रतीक्षा आहे. पतीचा शोध घेऊन संपूर्ण घटनेचे गूढ उलगडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.