

Speeding truck hits two-wheeler, one killed, one injured
केज, पुढारी वृत्तसेवा : केज मांजरसुंबा रस्त्यावरील सावंतवाडी फाट्यावर शुक्रवारी (दि. १२) मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुण ठार झाला, तर त्याचा साथीदार गंभीर जखमी झाला. मृत तरुणाचे नाव विशाल किसन चाळक (वय २३, रा. उमरी) असे आहे. जखमी झालेल्याचे नाव महावीर गोरोबा मुळे (वय ४१) असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उमरी येथील हॉटेल चालक विशाल चाळक व महावीर मुळे हे शुक्रवारी रात्री सावंतवाडीवरून दुचाकीने (एम एच-४४/ए बी-६५४२) गावाकडे परत येत होते. सावंतवाडी फाट्यावर त्यांच्या गावातील बळीराम नरशिंग भैरट व दत्तात्रय सुधाकर भैरट यांच्याशी बोलण्यासाठी ते रस्त्याच्या कडेला थांबले असता, मस्साजोगकडून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने (के ए-५६/५४३९) त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. अपघातात विशाल चाळक गंभीर जखमी होऊन जागीच बेशुद्ध पडला. त्याला तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. तर महावीर मुळे यांना डोक्याला, जबड्याला, पायाला व शरीराच्या विविध भागांना मार लागून ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघातानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या ट्रक चालक आयुब मोहम्मदखॉन पठाण (रा. महाराणा प्रताप नगर, म्हाडा कॉलनी, लातूर) यास नागरिकांनी पाठलाग करून ट्रकसह पकडले. महावीर मुळे यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालकाविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार प्रल्हाद चव्हाण करीत आहेत.