

दिंद्रुड : माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथील उपबाजार पेठेत माजलगाव मतदार संघाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या हस्ते कृषी उत्पन्न बाजार समितीचा पेट्रोल पंपाचे रविवारी उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन होऊन गेल्या तीन दिवसांपासून या पेट्रोल पंपातून एक लिटर पेट्रोल ही अद्याप ग्राहकांना भेटले नसल्याने संताप व्यक्त होत आहे. बंद पेट्रोल पंपाचे उद्घाटन आमदारांनी केल्यामुळे आमदार प्रकाशदादांचे हसे आता होताना दिसत आहे.
दिंद्रुड येथील मोहखेड रोडवर कृषी उत्पन्न बाजार समितीची केवळ नावालाच उप बाजारपेठ आहे. या बाजारपेठेत गेल्या एक ते दीड वर्षांपासून पेट्रोल पंपाचे काम सुरू होते. आमदार प्रकाश सोळंके यांच्या हस्ते रविवारी पेट्रोल पंपाचा वाजत गाजत शुभारंभ संपन्न झाला. मात्र तीन दिवस उलटूनही लिटरभर पेट्रोल ही या पंपातून ग्राहकांना न मिळाल्याने आमदार प्रकाश सोळंके यांचे हसे होताना आता पाहायला मिळत आहे.
पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता पेट्रोलच्या मशीनची मोटार नादुरुस्त झाल्याने पेट्रोल विकणे बंद असल्याची माहिती मिळाली. केवळ डिझेल या पंपातून आता मिळत असून पेट्रोल कधी मिळणार हा प्रश्न आहे. पेट्रोल पंप नादुरुस्त होता तर आमदारांच्या हाताने उद्घाटन करण्याची घाई कृषी उच्च उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी का केली? याचेही कोडे उलघडत नाही. पेट्रोल पंपावर गेलेल्या प्रत्येक वाहनधारकांना रिकामे हाताने परतावे लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे.