

Thieves broke three shops in Majalgaon
माजलगाव : पुढारी वृत्तसेवा
माजलगाव शहरात वर्दळीच्या ठिकाणी असणाऱ्या तीन दुकानांचे शटर चोरट्यांनी तोडून चोरी केल्याची घटना समोर आली. या घटना आज (रविवार) पहाटे तीन ते साडेतीन वाजण्याच्या दरम्यान घडल्या आहेत. दरम्यान सतत होणाऱ्या चोऱ्यांमुळे माजलगावातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलिसांवर रोष व्यक्त करण्यात येत आहे.
या विषयी अधिक माहिती अशी की, माजलगावात सतत चोरीचे सत्र सुरूच आहे. काही दिवसांपूर्वीच मोंढ्यात घडलेली चोरीची घटना ताजी असतानाच आज रविवारी पहाटे बीड रोड या मुख्य रस्त्यावर असणाऱ्या खुर्शिद कुरेशी यांच्या सिटी बिर्याणी हाऊस या हॉटेलचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला. परंतु दुकानात मौल्यवान वस्तूसह कॅश काहीच मिळाले नाही.
त्याचवेळी चोरट्यांनी बाजूलाच असणाऱ्या पठाण यांच्या होनेस्टि मेन्स वेअर कपड्याच्या दुकानाचे शटर तोडण्याचा प्रयत्न केला. तर गजानन मंदिर रोडवर धपाटे यांचे ज्ञानेश्वरी मेडिकलचे शटर तोडून चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्हीचा डीव्हीआर व गल्ल्यात असणारे पाच हजार रुपये रोकड लंपास केली आहे. सदरील ठिकाणी पोलिसांनी भेटी दिल्या आहेत. अज्ञात चोरट्या विरोधात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान नेहमीच घडणाऱ्या चोऱ्यांच्या घटनांनी व्यापाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण असून याबाबत व्यापाऱ्यांमधून पोलिसांविषयी रोष व्यक्त करण्यात येत आहे.
माजलगाव शहरात सतत होणाऱ्या चोरीच्या घटनांनी व्यापारी घाबरले आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या हालचालित या चोऱ्या ठराविक चोरांकडूनच करण्यात येत असल्याचा अंदाज आहे. १६ दिवसात जवळपास २५ चोरीच्या घटना घडल्या आहेत. अशा घटना टाळण्यासाठी शहरात ५ कोटी रुपयांचे सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांच्या निग्राणीत बसवण्यात आले आहेत. तरीही पोलिसांचा तपास शून्य आहे.
पोलीस नेमकं करतात काय? असा प्रश्न उपस्थित करत व्यापारी महासंघाचे ता. अध्यक्ष सुरेंद्र रेदासनी यांनी पोलिसांवर आपला रोष व्यक्त केला आहे. दरम्यान याबाबत बीड पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनाही लक्ष देण्याची विनंती केली असल्याचे ते म्हणाले. चोरट्यांच्या या टोळीचा लवकरात लवकर छडा लावावा अशी मागणी व्यापारी वर्गातून केली जात आहे.