

Lumpy outbreak in cattle in Beed district
बीड, पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील शेतकरी, पशुपालकांसमोर लंपीचे संकट उभे राहिले असून धारुर आणि परळीतील तीन जनावरांना लंपीची लागण झाल्याचे समोर आले आहे. इतरही शेकडो जनावरांना लक्षणे दिसून येत असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडूनही पावले उचलली जात आहेत.
बीड जिल्ह्यातील पशुपालकांसमोर लंपीचे संकट उभे राहिले आहे. गतवर्षी देखील लंपीचा प्रादुर्भाव झाला होता. यानंतर आता पुन्हा एकदा जनावरांना लंपी झाल्याचे समोर येत आहे. पशुसंवर्धन विभागाकडून संशयीत जनावरांची तपासणी करुन प्रयोगशाळेला ब्लड सॅम्पल पाठवले होते. त्याचा अहवाल पॉझीटीव्ह आला असून आता उपाययोजना केल्या जात आहेत. तीन जनावरांचे अहवाल आले असले तरी इतरही शेकडो जनावरांना लंपीची लक्षणे दिसत असल्याने त्या दिशेने उपचार केले जात आहेत.
बीड जिल्ह्यात लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव गोवर्गीय पशुधनामध्ये झालेला आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी काळजी घेण्याबरोबरच उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत. यामध्ये प्रतिबंधात्मक लसीकरण, बाधीत पशुधनाचे विलगीकरण करून उपचार, मृत्यू झाल्यास शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे याबाबत सूचना केल्या आहेत. तसेच याकरिता मनुष्यबळाची नियुक्ती करावी अशा सूचना देखील पंचायत समिती, नगर पंचायत यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांना केल्या आहेत.