

गोविंद खरटमोल
अंबाजोगाई :- अंबाजोगाई शहर व परिसरात गेली दोन दिवसांपासून पावसाची संततधार चालू आहे. सर्वच ठिकाणी पाणीच पाणी दिसून येत आहे. याचा फटका एसटी बसला देखील बसू लागला आहे. आधीच मोडकळीस आलेल्या बस त्यात आपला जीव मुठीत घेऊन प्रवासी प्रवास करताना दिसतात. पत्रा फाटलेल्या तसेच मोडकळीस आलेल्या बस अनेक ठिकाणी पाठवल्या जात आहेत .नाईलाजाने प्रवाशांना अशा बसमध्ये बसून त्यांना प्रवास करावा लागतो आहे.
अशीच आज एक बस अंबाजोगाई ते अहमदपूर जात असतांना संततधार पावसामुळे बसच्या पत्र्यातुन सदर बसमध्ये पावसाचे पाणी टपकू लागल गळणारे पाणी संपूर्ण बसमध्ये येऊ लागल्याने प्रवाशांना रेनकोट तसेच छत्रीचा सहारा घ्यावा लागला. पावसाचे पाणी बसच्या चालक केबिनमध्ये देखील टपकु लागल्याने बसमधील प्रवाशाला बस चालकाच्या डोक्यावर छत्री धरावी लागली.
चालकाच्याच्या डोक्यावर पाणी टपकत असल्याने त्याला बस चालवताना अडचण येऊ लागली. इतर प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन बसमधील एका प्रवाशाने चक्क चालकाच्या डोक्यावर छत्री धरली. त्यानंतरच बस चालकास बस सुरळीत पणे चालवता आली. या प्रकारावरून अंबाजोगाई आगाराच्या बसची किती मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाल्याचे दिसून आले. नादुरुस्त किंवा मोडकळीस आलेल्या सर्व बसची तात्काळ दुरुस्त कराव्यात . अंबाजोगाई आगारास मंजूर झालेल्या नवीन बसेस तात्काळ मागवून घ्याव्यात व प्रवाशांची होणारी हेळसांड तात्काळ थांबवावी अशी मागणी प्रवाशी वर्गातून केल्या जात आहे.