

गौतम बचुटे
केज : केज-कळंब रोडवर चिंचोली पाटी जवळ पुलावर असलेली जम्पिंग आणि रस्त्याला पडलेला खड्डा चुकविण्याच्या नादात चालकाचे वाहनावरचे नियंत्रण सुटून कार पुलाच्या लोखंडी कठड्याला धडकून व लोखंडी कठड्याचा पत्रा तोडून रस्त्याच्या कडेच्या खड्ड्यात कोसळली; पण सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.
या बाबतची माहिती अशी की, दि. २० ऑगस्ट रोजी सकाळी १०:३० सुमारास एक कार ही महामार्ग क्र. ५४८-सी वरून केज कडून कळंबच्या दिशेने जात असताना चिंचोली पाटी जवळ असलेल्या प्रताप गुंड यांच्या शेता जवळ असलेल्या पुलाला वरचा रस्ता हा जम्पिंगचा आणि समोर असलेला खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात कार आदळून चालकाचे कारवरचे नियंत्रण सुटून प्रथम पश्चिम बाजूल ड्रायव्हर साइडला गेली. त्या नंतर उजव्या बाजूचा पुलाच्या लोखंडी पत्रा असलेला कठडा तोडून सुमारे १५ खोल खड्ड्यात पडली. मात्र सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. मात्र कारचे मोठे नुकसान झाले आहे.
पुलाच्या कठड्याचा पत्रा तोडून कार खाली खड्ड्यात जात असताना तो धारदार पत्रा गाडीत घुसला नाही तसेच त्या ठिकाणी खार पडली त्याच्या पुढे आणखी एक खड्डा होता. मात्र या सर्व प्रकारातून नशीब बलवत्तर म्हणून कुणीही जखमी झाले नाही.
रस्त्यावरचे खड्डे दुरुस्ती आणि जम्पिंग दुरुस्त का होत नाही ? :- या ५४८सी मार्गावरच्या बहुतांशी पुलावरचा रस्ता हा जम्पिंगचा असल्याने वाहने आदळत आहेत. त्यामुळे चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटणे किंवा वाहनांचे नुकसान होणे असे प्रकार घडतात मात्र रस्त्याचे देखरेख करणारे अधिकारी आणि गुत्तेदार यांना या तृटी का दिसत नाहीत ?