

Georai mother daughter death
गेवराई : तालुक्यातील मालेगाव मजरा येथील दोन वर्षाच्या चिमुकलीसह आईने गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना सोमवारी (दि. १८) दुपारी घडली. याबाबत माहेरकडील नातेवाईक यांनी आक्षेप घेत जोपर्यंत सासरकडील मंडळीच्या विरोधात गुन्हा दाखल होणार नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात देणार नाही, असा पवित्रा घेतला. अखेर आज (दि.१९) तलवाडा पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर तब्बल चोवीस तासांनंतर मायलेकीच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी केली. सायंकाळी सहाच्या दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात आले.
मालेगाव मजरा (ता.गेवराई) येथील अंकिता बळीराम घवाडे (वय २५) हिने दोन वर्षाची शिवप्रीता हिच्यासह घरातच अंकिताने गळफास घेऊन जीवन संपविले . हा धक्कादायक प्रकार पती बळीराम यांना दिसताच मायलेकीचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. अंकिताच्या माहेरकडील नातेवाईकांना घटनेची माहिती समजताच बीड जिल्हा रुग्णालयात धाव घेत गर्दी केली होती.
दरम्यान, अंकिताचे तीन वर्षापूर्वी मालेगाव येथील बळीराम याच्याशी विवाह झाला होता. तीन वर्ष सुखी संसार सुरु असतानाच सोमवारी (ता १८) अंकिताने टोकाचे पाऊल उचलले. साळींबा (ता. वडवणी) येथील मृत अंकिताचा भाऊ राम जाधव याने आक्षेप घेत तिचा सासरकडील लोक हुंड्यावरुन मानसिक व शारीरिक छळ करत असल्याचा आरोप केला. सासरकडील मंडळींच्या विरोधात गुन्हा दाखल होणार नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही. असा पवित्रा घेतला.
यामुळे तणावग्रस्त परिस्थिती निर्माण होत असल्याने अखेर आज (दि. १९)तलवाडा पोलीस ठाण्यात पती, सासु, सासरे, नणंद अन्य दोन जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्ररणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक मनोज निलंगेकर यांनी दिली.