

Kej Police Illegal Gutkha seizure
गौतम बचुटे
केज : मध्यप्रदेशातून तब्बल एक कोटी रुपयांचा गुटखा घेऊन निघालेला ट्रक केज पोलिसांनी एका थरारक सिनेस्टाईल पाठलाग करत पकडला. केवळ गुटखाच नव्हे, तर या कारवाईत सात जिल्ह्यांमध्ये तब्बल १७ गंभीर गुन्हे दाखल असलेला एक वॉन्टेड गुन्हेगारही पोलिसांच्या हाती लागला आहे. या धाडसी कारवाईमुळे केज पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या प्रकरणी उपनिरीक्षक उमेश निकम यांच्या फिर्यादीवरून रईसोयीन अमीरोद्दीन शेख (चालक), परशुराम मोहन गायकवाड, जालीमसिंग (माल पुरवणारा), रुपेश मालपाणी (माल घेणारा) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. ७ ) मध्यप्रदेशातून एक ट्रक (क्र. DD-02/S-9442) मोठ्या प्रमाणात गुटखा घेऊन केजमार्गे धाराशिव जिल्ह्यातील कळंबकडे जात असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक स्वप्नील उणवणे यांना मिळाली होती. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक उणवणे यांनी तात्काळ एक पथक तयार करून कारवाईचे आदेश दिले. पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात सापळा रचला, मात्र ट्रकचालकाने पोलिसांना पाहताच कळंबच्या दिशेने वेगाने ट्रक पळवला. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे, उपनिरीक्षक उमेश निकम आणि त्यांच्या पथकाने तात्काळ पाठलाग सुरू केला. सुमारे दीड किलोमीटरच्या पाठलाग केल्यानंतर पोलिसांनी कमल पेट्रोल पंपाजवळ ट्रकसमोर गाडी आडवी लावली आणि ट्रक थांबवला.
पोलिसांनी ट्रक थांबवताच चालकाच्या बाजूला बसलेला परशुराम मोहन गायकवाड याने ट्रकमधून उडी मारून जवळच्या शेतात पळ काढला. परशुराम गायकवाड हा पळून जाऊन उसाच्या शेतात लपला होता. पोलीस उसाच्या शेतात घुसले. काही अंतरावर अंगावरील शर्ट काढून तो एका बांधाजवळ साचलेल्या पाण्यात लपून बसल्याचे दिसले. पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले.
या कारवाईत ताब्यात घेतलेला परशुराम गायकवाड याच्यावर पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, बुलढाणा, नाशिक आणि बीड या सात जिल्ह्यांमध्ये सशस्त्र दरोडा, वाटमारी, चोरी आणि गुटखा तस्करीसारखे १७ गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो पोलिसांना अनेक दिवसांपासून हवा होता.
पोलिसांनी ट्रकची झडती घेतली असता, त्यात ७४ लाख ५२ हजार रुपये किंमतीचा गुटखा आणि २७ लाख रुपयांचा ट्रक असा एकूण १ कोटी १ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चौकशीत हा गुटखा मध्यप्रदेशातील जालीमसिंग (रा. बुरहानपूर) याने भरून दिला होता आणि तो कळंब येथील व्यापारी रुपेश मालपाणी याला पोहोचवायचा होता, अशी माहिती समोर आली.
पोलीस निरीक्षक स्वप्नील उणवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. या मोठ्या कारवाईनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी शिंदे यांनी पोलीस ठाण्याला भेट देऊन पथकाचे अभिनंदन केले.