Beed property fraud case : प्लॉटचा मालक बारामतीत; अन्‌‍ केजमध्ये झाली ‌‘बोगस‌’ रजिस्ट्री!

तिघांविरुद्ध फसवणुकीचा केज पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

केज : केज येथील सहायक दुय्यम निबंधक कार्यालयात स्थावर मालमत्तेच्या बोगस दस्तनोंदणीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बारामती येथे वास्तव्यास असलेल्या आणि केज येथील गट क्रमांक २२८/२/४ मधील ३.६० आर क्षेत्रफळाच्या प्लॉटचे खरे मालक प्रवीण दादा निकम यांना कोणतीही माहिती न देता, त्यांच्या जागी बनावट व्यक्ती उभी करून तसेच बोगस कागदपत्रे व साक्षीदारांच्या आधारे प्लॉटचे खरेदीखत करून घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर केज पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील सोरडे वस्ती येथील प्रवीण दादा निकम यांनी केज येथील गट क्रमांक २२८/२/४ मधील ३.६० आर जमीन १७ जानेवारी २०२३ रोजी रीतसर खरेदी केली होती. सदर खुल्या प्लॉटबाबत कोणताही वाद नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Crime News
Sanjay Lakhe Patil : मंत्री विखे पाटील मराठा समाजाला भूलविण्याचे काम करताहेत

मात्र, १४ मे २०२५ रोजी दुय्यम निबंधक कार्यालय, केज येथे दस्त क्रमांक १६८१/२०२५ अन्वये या प्लॉटचे खरेदीखत करण्यात आले. विशेष म्हणजे, या व्यवहारासाठी प्रवीण निकम केज येथील दुय्यम निबंधक कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित नसतानाही त्यांच्या नावाने खरेदीखत करण्यात आल्याचा आरोप आहे.

तक्रारीनुसार, आरोपी रोहन रवींद्र कोमटवार याने संबंधित व्यक्तींशी संगनमत करून स्वतःच्या नावावर सदर प्लॉटची बोगस रजिस्ट्री करून घेतली. यासाठी प्रितम प्रकाश नांदेडकर व शांतीनाथ प्रकाश काळे यांना साक्षीदार म्हणून दाखविण्यात आले. दस्तनोंदणीच्या वेळी एका टोपी घातलेल्या अज्ञात व्यक्तीला कॅमेऱ्यासमोर उभे करण्यात आले आणि त्यावर जुन्या दस्तावरील प्रवीण निकम यांच्या छायाचित्राचा वापर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Crime News
Sambhajinagar property tax recovery : कर थकलेल्या २१ व्यावसायिक मालमत्ता सील

तक्रारीची दखल न घेतल्याने न्यायालयात धाव

आपल्या मालमत्तेची अशा प्रकारे परस्पर विक्री झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर प्रवीण निकम यांनी संबंधित प्रशासनाकडे तक्रार केली. मात्र, तक्रारीची दखल घेतली जात नसल्याने त्यांनी केज न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानंतर निकम यांच्या तक्रारीवरून केज पोलिस ठाण्यात रोहन रवींद्र कोमटवार (रा. गल्ली, केज), प्रितम प्रकाश नांदेडकर (रा. अयोध्या नगर, धारूर) आणि शांतीनाथ प्रकाश काळे (रा. संभाजी चौक, धारूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब रोडे पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news