

Kapildharwadi villagers' lives in danger; Immediate rehabilitation required
बीड, पुढारी वृत्तसेवा सततच्या मुसळधार पावसामुळे व अतिवृष्टीमुळे बीड तालुक्यातील कपिलधार वाडी या छोट्याशा ९० कुटुंबांच्या गावात भूस्खलन सुरू झाले असून गावकऱ्यांचे आयुष्य अक्षरशः धोक्यात आले आहे. घरांच्या भिंतींना, शाळा खोलींना, मंदिरांना व रस्त्याला तडे जाऊन भेगा पडत असल्याने गावकऱ्यांना कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याची तातडीची गरज निर्माण झाली आहे. या संदर्भात आ. संदीप क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मदत व पुनर्वसन मंत्री, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तसेच वरिष्ठ प्रशासनाला पत्र देवून ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
गावात आजच्या घडीला ग्रामस्थ, महिला, शाळकरी विद्यार्थी व आबालवृद्ध आपला जीव धोक्यात घालून श्री. मन्मथ स्वामी देवस्थान येथे विसाव्याला गेले आहेत. रोजच्या राहणीमान, भोजन आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. कपिलधार वाडी गाव तातडीने बोकाग्रस्त क्षेत्र घोषित करावे, सर्व कुटुंबांचे तात्काळ स्थलांतर व पुनर्वसन व्यवस्था करावी. कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी नवीन जागा व निवासी योजना जाहीर करून अंमलबजावणी करावी.
शाळा व सार्वजनिक इमारतीची सुरक्षा तपासून विद्याथ्यर्थ्यांना पर्यायी शैक्षणिक व्यवस्था द्यावी. आपत्ती निवारण निधी, नरेगा व पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून निधी मंजूर करून गावकऱ्यांना मदत करावी. यासंदर्भात पंच कमिटी श्री. कपिलधार यांना प्रशासनाने यथोचित अवगत करून, गावकऱ्यांच्या निवास, भोजन व शाळकरी मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करावी, अशी मागणी आ. संदीप क्षीरसागर यांनी केली आहे.
कपिलधारवाडीतील ग्रामस्थांना रोज जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे. सततचे भूस्खलन आणि तडे यामुळे गावकरी घरात परतण्यासही घाबरत आहेत. शासनाने तातडीने हस्तक्षेप करून या गावाचे कायमस्वरूपी पुनर्वसन करणे अपरिहार्य आहे. अन्यथा कुठल्याही क्षणी मोठी दुर्घटना घडू शकते," असे आमदार संदीप क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.