Success story: शेतकऱ्याच्या संघर्षाचं झालं सोनं! गेवराई तालुक्यातील चार सख्या बहिणी झाल्या पोलिस

Maharashtra police news: या संघर्ष कन्येंनी रात्रंदिवस अभ्यास करून मिळवलेलं हे ऐतिहासिक यश आदर्शवत आहे
Maharashtra police news
Maharashtra police news
Published on
Updated on

सुभाष मुळे

गेवराई: शेतकऱ्याच्या घामाने पिकवलेलं धान्य आणि त्याच घामातून उभं राहिलेलं स्वप्न आज प्रत्यक्षात उतरलं आहे. गेवराई तालुक्यातील नंदपूर गावातील शेतकरी कुटुंबातील चार सख्या बहिणींनी पोलिस दलात प्रवेश मिळवत इतिहास रचला आहे. चंद्रसेन उबाळे यांच्या या संघर्ष कन्येनी रात्रंदिवस अभ्यास करून मिळवलेलं हे ऐतिहासिक यश आदर्शवत आहे.

कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतावर अवलंबून

उन्हातान्हात राबून मुलींच्या शिक्षणासाठी वडिलांनी झगडणं सुरू ठेवलं. आर्थिक संकटं, शेतातल्या अडचणी, पावसाचा लपंडाव...अशा अनेक समस्यांवर मात करत त्यांनी मुलींना शिक्षण दिलं. घरची परिस्थिती कितीही कठीण असली तरी “मुलींना उभं करायचंच” हा निर्धार वडिलांनी सोडला नाही. या अथक परिश्रमाचं चीज आज मुलींनी सोन्याहून पिवळं उत्तर देत केलं आहे. चारही बहिणींनी पोलिस भरतीत यश मिळवून गावाचं नाव उज्ज्वल केलं आहे. वडिलांच्या डोळ्यांतले आनंदाश्रू हेच या यशाचं खरं गमक ठरत आहेत.

कुटुंबाचा मोठा संघर्ष

आज त्या बीड जिल्ह्यातील माजलगाव, बीड तसेच पिंपरी चिंचवड आणि छत्रपती संभाजीनगर याठिकाणी ज्योती, अश्विनी, दिपाली, व मोहीनी या चार सख्या बहिणी पोलिस दलात कार्यरत आहेत. पाचवी बहीण देखील पोलिस भरतीची तयारी करत असून त्या एकूण सहा बहिणी व एक भाऊ आहे. दहा एक्कर जमीन होती, त्यातून दोन एक्कर जमीन विक्री करुन शिक्षण पुर्ण केले. घर पावसामुळे गळत असले तरी त्यात सहनशिलता, त्याग आणि संघर्ष खुप मोठा आहे. कापुस वेचून, खुरपणी करून यातील या चारही बहीणींनी खुप कष्ट करून हे यश मिळवलं.

चार बहिणींच्या यशाने अनेक कुटुंबातील मुलींच्या स्वप्नांना बळ

गावकऱ्यांनी या यशाचं जोरदार स्वागत केलं. नंदपूरसह संपूर्ण गेवराई तालुक्यात या घटनेची चर्चा असून “शेतकऱ्यांच्या लेकरांनी काय करता येतं” याचं हे उत्तम उदाहरण असल्याचं सांगितलं जातं. समाजासाठी प्रेरणादायी आदर्श सांगायचा झाल्यास चार सख्या बहिणींच्या या यशामागे जिद्द, चिकाटी आणि पालकांचा संघर्ष दडलेला आहे. मुलींनी केवळ कुटुंबाचंच नव्हे तर ग्रामीण भागातील अनेक कुटुंबातील मुलींना स्वप्न बाळगण्याची हिंमत दिली आहे. शेतकऱ्याच्या घामातून उमललेली ही स्वप्नं पोलिस दलाच्या गणवेशात आता समाजाची सेवा करतील. सलाम या संघर्षातून उभ्या राहिलेल्या शेतकऱ्याच्या कन्यांना...

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news