

Investigation into complaint filed against Vijay Pawar 2 years ago Rupali Chakankar
बीड : विजय पवार याच्या विरोधात दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या सीईओंकडे तक्रार झाली होश्रती. आता जसा प्रकार घडला तसाच त्यावेळी घडला होता, याबाबतची चौकशी होणार असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिली. त्यांनी शनिवारी बीडमधील कोचिंग क्लासमध्ये लैंगिक शोषण झालेल्या विद्यार्थिनीसह कुटुंबाची भेट घेत त्यांना धीर दिला. तसेच पोलिस तपासाचा देखील आढावा घेतला.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी शनिवारी सकाळी पोलिस अधीक्षक कार्यालयात विद्यार्थिनी लैंगिक शोषण प्रकरणाची माहिती घेतली व विजय पवारच्या शाळेतील विद्यार्थिनींबाबत २०२३ मध्येही असा प्रकार घडल्याची तक्रार पालकांनी केली आहे. याची दखल घ्यावी तसेच संबंधित विद्यार्थिनी, पालक यांच्या तक्रारीविषयी सर्व माहिती पोलिसांनी घ्यावी व योग्य ती कारवाई करावी, अशा सूचना त्यांनी केल्या.
पुढे त्या म्हणाल्या, बीडमधील घटना गुरू-शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी आहे. या प्रकरणातील आरोपी विजय पवार, प्रशांत खाटोकर यांचे मोबाईल, लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. सीसीटीव्ही फुटेजचा डाटादेखील जप्त करण्यात येत आहे.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलेला असून त्यामध्ये आता एसआयटीदेखील नियुक्त करण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्व बाजूंनी तपास होईल,असे त्यांनी सांगितले. आरोर्षीचे राजकीय लागेबांधे आहेत का ? हे तपासातून नक्कीच समोर येईल त्यामुळे या प्रकरणाचा तपास पूर्ण होणे गरजेचे आहे. आरोपींचे सीडीआरही तपासले जात आहे.
एका पालकाने तीन दिवसांपूर्वी माध्यमांसमोर येत स्वतःच्या मुलीसोबत २०२३ मध्ये विजय पवार व त्याच्या साथीदाराने केलेल्या कृत्याचा पाढा वाचला. निवेदनदेखील दिले आहे. वास्तविक पाहता २०२३ मध्येच त्या पालकांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दिली होती. त्याचवेळी कारवाई का केली गेली नाही ? याची देखील चौकशी करण्यात येणार आहे.
खाटोकर पीडितेला वारंवार गाडीवर घेऊन जाण्याच्या प्रयत्नात होता, त्याची नेमकी मानसिकता काय होती ? तो कुठे घेऊन जाणार होता ? याचादेखील शोध चौकशीअंती घेण्यात येणार आहे. आरोपींनी त्यांच्या मोबाईलमध्ये काही रेकॉर्डिंग केले आहे का? हे देखील तपासले जात असून त्यानुसार आरोपामध्ये पुरवणी आरोपपत्र जोडले जाईल.