

Husband and wife had a dispute; husband hanged himself, three-year-old daughter missing
बीड, पुढारी वृत्तसेवा : पती-पत्नीत वाद झाल्यानंतर मी माझ्या मुलीला घेऊन जातो असे म्हणत पतीने तीन वर्षांच्या मुलीला सोबत घेऊन घर सोडले. त्यानंतर त्याचा मृतदेह मंगळवारी सायंकाळी ४ वाजता इमामपूर रोडवर गळफास घेत-लेल्या अवस्थेत मिळून आला, परंतु मुलगी मात्र अद्याप सापडलेली नाही. ग्रामीण पोलिसांचे पथक व नातेवाईक या मुलीचा शोध घेत आहेत.
जयराम शहादेव बोराडे (३३, रा. भाटसांगवी) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. जयराम याची पत्नी सध्या माहेरी औरंगपूर येथे आहे. किरकोळ कारणावरून त्या दोघांमध्ये मंगळवारी भांडण झाले. या भांडणानंतर जयराम याने मी माझ्या मुलीला घेऊन जातो असे म्हणत तीन वर्षाच्या अक्षराला सोबत घेऊन घर सोडले.
त्यानंतर त्याचा मृतदेह इमामपूर रोडवर गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. याची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मारुती खेडकर, सपोनि बाळराजे दराडे, अतिश मोराळे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, त्या ठिकाणी बोराडे यांची मुलगी तसेच दुचाकीदेखील आढळून आली नाही. यानंतर परिसरात या मुलीचा शोध घेतला परंतु ती मिळून आली नाही. अद्याप या प्रकरणात ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आलेली नसली तरी पोलिसांचे पथक मुलीचा शोध घेत आहेत.
जयराम बोराडे हा मुलीला घेऊन जात असताना मुलगी अक्षरा रडत होती. तिला समजावण्याचा तो प्रयत्न करत होता, परंतु ती काही केल्या ऐकत नव्हती. त्याने एका हॉटेलवर थांबून त्या ठिकाणी तिला बिस्कीट देखील खाऊ घातल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. त्यानंतर जयरामने गळफास घेतला, परंतु अक्षरा मात्र मिळून आलेली नाही.