

गेवराई; पुढारी वृत्तसेवा : नर्तिकेच्या नादात गेवराई तालुक्यातील लुखामसला येथील माजी उपसरपंचाने गोळी झाडून जीवनयात्रा संपविली. बार्शी तालुक्यातील सासुरे येथे ही घटना घडली असून, या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
गोविंद जगन्नाथ बरगे ( वय 38, रा. लुखामसला, ता. गेवराई, जि. बीड) असे जीवन संपवलेल्या उपसरपंचाचे नाव आहे. त्यांचे मेहुणे लक्ष्मण चव्हाण (रा. जालना ) यांनी याबाबत वैराग पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. सासुरे येथील नर्तिका पूजा गायकवाड ही आत्महत्येस कारणीभूत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
बरगे हे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच होते, तसेच त्यांचा प्लॉटिंगचा व्यवसाय होता. सोमवारी (दि. 8) ते खासगी कारणास्तव आपल्या कारने बार्शीकडे गेले होते. मात्र, मंगळवारी सकाळी बार्शी तालुक्यातील सासुरे गाव शिवारात उभ्या असलेल्या त्यांच्या कारमध्ये त्यांचा मृतदेह आढळला. बरगे यांचा संबंध पारगाव कला केंद्रात पूजा गायकवाड (वय 21) हिच्याशी आला होता. काही दिवसांपूर्वी त्यांनी पूजाला पावणेदोन लाखाचा मोबाईल तसेच सोन्याचे दागिने भेट दिले होते. याशिवाय पूजा त्यांच्याकडून पैसे उकळत असे. गेवराईतील घर आपल्या नावावर करून द्यावे, असा तगादा तिने बरगे यांच्याकडे लावल्यामुळे ते तणावात होते.