

Hundreds of trees grown at the expense of lakhs of rupees were cut down by the wind mill company, angering the villagers
नेकनूर, पुढारी वृत्तसेवा शासनाने नेकनूरजवळील गारपीर ते चाकरवाडी अशी दुतर्फा वृक्ष लागवड केली. रोहियो अंतर्गत 2014 -2015 मध्ये लाखो रुपये खर्चून ही वृक्ष लागवड करण्यात आली. याची देयके बाकी असताना या भागात पवनचक्की उभारण्यासाठी वाहनांना रस्ता मोठा हवा असल्याने ही झाडे उखडून टाकण्यात आली. त्यामुळे वृक्षप्रेमी नागरिकांनी संताप व्यक्त केला असून संबंधित कंपनीवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी रामनाथ घोडके यांनी केली आहे.
बीड जिल्ह्यात सध्या दुष्काळाच्या झळा सोसत असताना आणि पाण्यासाठी टाहो फुटत असताना, दुसरीकडे मात्र नेकनूर परिसरामध्ये निसर्गाचा गळा घोटणारा प्रकार समोर आला आहे. गारपीर माथा ते चाकरवाडी या रस्त्याच्या दुतर्फा शासनाने लाखो रुपये खर्च करून वाढवलेली शेकडो झाडे एका खासगी पवनचक्की कंपनीने आपल्या वाहनांना अडचण होते म्हणून तोडून टाकली आहेत.
कंपनीच्या या बेजबाबदार आणि मुजोर कारभारामुळे पर्यावरणप्रेमींसह स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून, संबंधित प्रशासनाने या कंपनीवर तात्काळ गुन्हे दाखल करून कडक कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. नेकनूर येथील गारपीर माथा ते चाकरवाडी या रस्त्यावरून पवनचक्की कंपनीच्या अवजड वाहनांना आणि साहित्याला ये-जा करण्यासाठी अडथळा निर्माण होत होता. केवळ स्वतःचा स्वार्थ आणि वाहतुकीची सोय पाहण्यासाठी या कंपनीने रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली, शासनाने जवळपास तेवीस लाख रुपयांचा निधी खर्च करून जोपासलेली मोठी झाडे तोडण्यात आली आहेत.
ही झाडे मोठी होऊन परिसराची शोभा वाढवण्यासह निसर्गाचा समतोल राखला असता, मात्र कंपनीच्या मुजोरीपुढे निसर्गाचा बळी देण्यात आला. एकीकडे शासन 'झाडे लावा, झाडे जगवा' चा नारा देते, तर दुसरीकडे अशा खासगी कंपन्या शासकीय मालमत्तेची आणि निसर्गाची उघडउघड नासधूस करत आहेत. संपूर्ण महाराष्ट्र सध्या भीषण दुष्काळाच्या छायेत आहे. अशा परिस्थितीत एक-एक झाड जगवणे गरजेचे असताना, शेकडो झाडे तोडण्याचे धाडस या कंपनीकडे आले कुठून? असा संतप्त सवाल सर्वसामान्य जनतेतून विचारला जात आहे.
निसर्गाचा समतोल बिघडवून स्वतःचा खिसा भरणाऱ्या या कंपन्यांना कायद्याची कसलीच भीती उरलेली नाही का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या गंभीर प्रकारानंतर नेकनूर परिसरातील नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या वृक्षतोडीचा तीव्र निषेध केला आहे.