

बीड : जीएसटी विभागातील अधिकारी सचिन जाधवर यांनी दोन महिन्यांपूर्वी मांजरसुंबा महामार्गावर कपिलधारवाडी परिसरात जीवन संपवले होते. या प्रकरणी जीएसटी अधिकारी प्रदीप फाटे यांच्या विरोधात बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात जीवन संपवण्यास कारणीभूत प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता.
प्रदीप फाटे याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला तरीही फाटे पोलिसांना सापडत का नाही असा प्रश्न उपस्थित करत फरार अधिकारी प्रदीप फाटेला अटक करावी या मागणीसाठी मयत सचिन जाधवर यांचे कुटुंब बुधवारी (दि.२५) बीड पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण केले. दरम्यान पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.
बीड येथील जीएसटी अधिकारी सचिन जाधवर यांनी वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून दोन महिन्यांपूर्वी कपिलधारवाडी परिसरात जीवन संपवले होते. या प्रकरणात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. ४० दिवसांचा कालावधी लोटूनही फरार आरोपीस अटक करण्यास पोलिसांना यश आलेले नाही.
पंधरा दिवसांपूर्वी न्यायालयातून आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला आहे. मात्र तरीही पोलिस यंत्रणा आरोपीला अटक करत नसल्याचा आरोप करत मृत्त सचिन जाधवर यांच्या पत्नी मयुरी जाधवर यांनी, आरोपीला तत्काळ अटक करावी यासाठी आमरण उपोषणाचा इशारा दिला होता.
एक महिना झाल्यानंतरही कुटुंबाला न्याय मिळत नसल्याने मयुरी जाधवर यांनी बुधवारी सकाळपासून बीड पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले. मेडिकल रजेवर असलेल्या प्रदीप फाटे यांच्या विरुद्ध जीएसटी विभागातील वरिष्ठ अधिकारी निलंबनाची कारवाई का करत नाहीत आणि आरोपीला गुन्हा दाखल झाल्यावर दोन तासांत हजर करू असे सांगत होते, ते पोलिस आता आरोपीला का पकडू शकत नाहीत असा थेट प्रश्न केला. आरोपीला अटक होईपर्यंत आपले उपोषण सुरूच राहील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. यावेळी जाधवर कुटुंबीयांचे नातेवाईक मोठ्या संख्येने या उपोषणात सहभागी झाले होते.
पोलिसांकडून आरोपीच्या अटकेचे आश्वासन; उपोषण मागे
आरोपी प्रदीप फाटे याला येत्या सोमवारपर्यंत अटक केली जाईल, असे आश्वासन एसपी ऑफिससमोर उपोषणाला बसलेल्या जाधवर कुटुंबीयांना बुधवारी दुपारी पोलिस उपअधीक्षक पूजा पवार यांनी दिले दिले, तसेच त्याला फरार घोषित करून त्याची संपत्ती जाप्त करण्याची कार्यवाही केली जाईल, असे सांगतउपोषणार्थी मयुरी जाधवर व जाधवर यांच्या नातेवाईकांशी चर्चा करण्यात आली. या प्रकरणात पोलिस तपासाला गती देण्यात येत असून कायदेशीर प्रक्रिया तातडीने राबवली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले. पोलिसांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले.