

तळणी : मंठा तालुक्यातील भुवन येथील गट क्र. 1 मधील अधिकृत वाळूघाटावर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळू उत्खनन सुरू असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या संदर्भात ग्रामस्थांनी जालना जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सदर वाळूघाटाचा लिलाव आशा अंडरवॉटर सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीने घेतला असून, प्रोप्रायटर दिनेशकुमार रामेश्वरलाल बावन (रा. कल्याण बेस्ट, ठाणे, मुंबई) यांनी सर्वोच्च बोली लावून घाट ताब्यात घेतल्याचे सांगितले जाते. मात्र, अधिकृत परवाना असला तरी नियमांची सर्रास पायमल्ली केली जात असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.
ग्रामस्थांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, संबंधित वाळू लिलावधारक रात्रीच्या वेळी पोकलँडच्या सहाय्याने नदीपात्रात मोठ्या प्रमाणात उत्खनन करीत आहेत.जीपीएस यंत्रणा बंद ठेवून किंवा नदीपात्रात ठेवून नियमांची पायमल्ली केली जात असल्याचा आरोप निवेदनात केला गेला आहे. रॉयल्टीची अधिकृत पावती न घेता वाळूची अवैध वाहतूक होत असल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
या वाळूघाटात 10 ते 15 फूट खोल खड्डे पडले असून त्यामुळे परिसरातील जनावरांना व नागरिकांच्या जीविताचा धोका निर्माण झाला आहे. सकाळी एकदाच रॉयल्टी घेऊन त्याच पावतीवर दिवसभर तीन ते चार ट्रीप वाहतूक करण्यात येत असल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे शासनाचा महसूल बुडत असल्याची संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
एटीएस मशीनद्वारे मोजणीची मागणी
ग्रामस्थांनी संबंधित वाळूघाटाची एटीएस मशीनद्वारे तत्काळ मोजणी करण्यात यावी, अशी मागणी केली.
तक्रारीत तथ्य असल्यास कारवाई
तक्रारी तथ्य असल्यास कारवाई करण्यात येईल असे तहसीलदार सुमन मोरे यांनी सांगितले.