

बीड : परळी येथील सहदेव सातभाई यांना जीवे मारण्याचा प्रयत्न व लूटमार केल्याच्या प्रकरणात रघु फड याच्यासह त्याच्या टोळीतील सातजणांवर मकोका नुसार कारवाई करण्यात आली होती. परंतु आता अपर पोलिस महासंचालकांनी यातील वाल्मीक कराडचा राईट हँड गोट्या गीते याच्यासह पाचजणांवरील मोका रद्द केला आहे. तर उर्वरीत दोघांवर मात्र ही कारवाई करण्यात येणार आहे.
परळी येथील सहदेव सातभाई यांना गंभीर मारहाण व लूटमारीची घटना घडली होती. या टोळीचा प्रमुख रघु फड, गोट्या गिते याच्यासह सातजणांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. ती कारवाई आता अपर पोलिस महासंचालकांनी रद्द केली आहे.
यामध्ये गोट्या गीते याचा देखील समावेश आहे. पाचजणांवरील मोका हटवण्यात आला असला तरी गुन्हा कायम आहे, त्यामुळे हे प्रकरण विशेष न्यायालयासमोर न चालता नियमीत चालेल, मोका लागल्यानंतर न मिळणारा जामीन, कठोर शिक्षा, मालमत्ता जप्ती, दंड यापासून दिलासा मिळाला आहे. टोळी प्रमुख रघुनाथ फड व धनराज गित्ते याच्यावरील मोका कायम आहे.
सातभाई यांना झालेल्या मारहाणीचा गुन्हा दोन वर्षानंतर दाखल झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी मोका लावण्याचा निर्णय घेतला होता. मात्र यात काही कमतरता राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच गोट्यासह इतर पाजचणांची गुन्हेगारी निष्पन्न करण्यात पोलिस कमी पडल्यानेच हे कलम रद्द करण्यात आले.
गोट्या गीते याच्यावर खून, खूनाचा प्रयत्न, खंडणी, असे दहा ते पंधरा गंभीर गुन्हे असून तो फरार आहे. टोळीतील गोट्या गिते, जगन्नाथ फड, संदिप सोनवणे, बालाजी दहिफळे, विलास गिते या पाचजणांचा मोका रद्द करण्यात आला आहे.