

शरद रेडेकर
आष्टी : शेतीत काहीच राहिले नाही, अशी हताश भावना व्यक्त करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांसमोर आष्टी तालुक्यातील कडा येथील दोन उच्चशिक्षित भावंडांनी आशेचा नवा दीप पेटवला आहे. कांदा पिकातील सततच्या तोट्यामुळे अक्षरशः हवालदिल झालेल्या या भावंडांनी अडीच एकरांवरील उभ्या कांद्यावर रोटर फिरवून धाडसी निर्णय घेत आल्याची लागवड केली आणि अवघ्या दहा महिन्यांत तब्बल 25 लाख रुपयांचे घवघवीत उत्पन्न मिळवून परिसरात चर्चेचा विषय ठरले आहेत.
गणेश सोनवणे (एम.एस्सी. ॲग्री) आणि शिवाजी सोनवणे (बी.एस्सी. ॲग्री) ही या प्रगतशील शेतकरी भावंडांची नावे. शेतीविषयक उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता त्यांनी स्वतःच्या शेतात आधुनिक शेतीचे प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. कांदा शेतीतून वारंवार होणारा तोटा आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे त्यांनी पर्यायी पिकाचा शोध सुरू केला.
यासाठी त्यांनी छत्रपती संभाजीनगर, सातारा आणि जालना जिल्ह्यांमध्ये जाऊन आल्याच्या शेतीचा सखोल अभ्यास केला. बाजारपेठेची मागणी, हवामान, उत्पादन खर्च आणि नफ्याचा ताळमेळ पाहून त्यांनी आल्याची शेती करण्याचा निर्णय घेतला.या संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे 1 लाख 75 हजार रुपयांचा खर्च आला. मात्र योग्य नियोजन आणि मेहनतीच्या जोरावर तब्बल 400 ते 425 क्विंटल उत्पादन मिळाले.
तरुण शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी दिशा
सोनवणे बंधूंनी सिद्ध करून दाखवले की, शेती ही केवळ परंपरा नसून आधुनिक दृष्टिकोनातून पाहिल्यास आर्थिक समृद्धीचा प्रभावी मार्ग ठरू शकतो. बदलत्या काळात पारंपरिक पिकांबरोबरच पर्यायी आणि बाजारपेठाभिमुख शेतीकडे वळल्यास शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतात. कडा येथील या यशोगाथेमुळे परिसरातील अनेक तरुण शेतकऱ्यांना नव्या आशा आणि नव्या दिशा मिळत आहेत.
2700 किलो बेण्यापासून 425 क्विंटल उत्पादन
सोनवणे बंधूंनी छत्रपती संभाजीनगर येथून ‘माहिम’ जातीचे 2700 किलो आल्याचे बेणे खरेदी केले. अडीच एकर क्षेत्रात 75 बेड तयार करून नियोजनबद्ध पद्धतीने लागवड करण्यात आली. ठिबक सिंचन, संतुलित खत व्यवस्थापन आणि रोगनियंत्रणामुळे पिकाची वाढ जोमदार झाली.
बाजारपेठेचा अचूक अभ्यास ठरला फायदेशीर
उत्पादित आले बंगळुरू आणि छत्रपती संभाजीनगर बाजारपेठेत विक्रीसाठी पाठविण्यात आले. प्रति किलो सुमारे 50 रुपये दर मिळाल्याने सोनवणे बंधूंना जवळपास 25 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. खर्च वजा जाता मोठा निव्वळ नफा हाती आल्याने त्यांच्या प्रयोगाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कांद्यावर रोटर फिरवला आणि आयुष्य बदलले
कांदा शेती वारंवार तोट्यात जात होती. उत्पादन खर्चही निघत नव्हता. त्यामुळे उभ्या कांद्यावर रोटर फिरवून आल्याची लागवड करण्याचा निर्णय घेतला. शेतीत तंत्रज्ञान, अभ्यास आणि बाजारपेठेचे ज्ञान वापरले तर शेतीही सोनं पिकवू शकते, असे गणेश सोनवणे यांनी सांगितले.