Onion farming loss : चहाचा कप दहा रुपयांना, कांदा मात्र एक रुपया किलो!

दर कोसळल्याने शेतकरी संकटात, शेती करायची कशी?
onion farming loss
ईट : कवडीमोल दरामुळे परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून कांदा विक्रीतून खर्चही निघत नसल्याने हतबलता वाढली आहे. शिवारात अनेक ठिकाणी कांद्याचे ढीग पडून आहेत. pudhari photo
Published on
Updated on

ईट : सध्या सर्वत्र महागाईचा भडका उडाला असताना शेतीमालाच्या दरात मात्र मोठी घसरण होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. विशेषतः कांद्याला मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आले आहे. चार महिने काबाडकष्ट करून, जीवापाड मेहनत घेत पिकविलेल्या कांद्याला एक कप चहापेक्षाही कमी दर मिळत असेल तर शेती करायची कशी, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांतून उपस्थित केला जात आहे.

ईट व परिसरात मोठ्या प्रमाणावर उन्हाळी कांद्याची लागवड केली जाते. मात्र गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांना 50 पैसे ते 5 रुपये प्रतिकिलो असा अत्यल्प भाव मिळत आहे. या दरामध्ये आडत, हमाली, वाहतूक, मजुरी, बियाणे, खते, फवारणी यांचा खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांना खिशातून पैसे टाकण्याची वेळ आली आहे.

विशेष म्हणजे कांदा भरण्यासाठी लागणारी रिकामी गोणीच 45 ते 49 रुपयांना विकत घ्यावी लागत आहे.एका बाजूला हॉटेलमधील छोटा चहाचा कप 10 रुपयांना, तर पाण्याची बाटली 20 रुपयांना मिळत असताना रात्रंदिवस राबून पिकविलेल्या कांद्याला कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकरी पुरता हतबल झाला आहे. ज्या कांद्याने कधीकाळी सर्वसामान्यांच्या डोळ्यांत पाणी आणले होते, आज तोच कांदा बळीराजाच्या डोळ्यांत अश्रू आणत असल्याची भावना शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news