

Gevrai: Sugarcane damage due to stormy winds, crops damaged due to heavy rain.
गेवराई, पुढारी वृत्तसेवा : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्याच्या रानमळा शिवारात पुन्हा एकदा निसर्गाचा घाला बसला आहे. वादळी वाऱ्यांनी ऊसासह उभी पिके अक्षरशः जमिनीवर आडवी केली, तर दुसरीकडे वारंवारच्या अतिसुष्टीमुळे इतर पिकांनी माना टाकल्या. शेतकरी हतबल आहे, पण प्रशासन मात्र अजूनही 'न पाहिल्यासारखे' वागत आहे.
शेतकऱ्यांच्या अश्रृंना शासनात बसलेल्यांची नजर पडत नसून याकडे डोळ-`झाक करत होत आहे. पण वास्तव एवढं भयाण आहे की, आज रान मळ्यात शेतात कष्टाने पिकवलेले पीक हे नेस्तनाबूत झाले आहे. त्यामुळे पिकासाठी घेतलेले कर्ज, उसनवारी कशी फेडायची याची चिंता आता शेतकऱ्याला लागली आहे.
शुक्रवारी रात्रीच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्याने रानमळा परिसराला अक्षरशः गाठलं. त्यानंतर झालेल्या पावसामुळे हिंगे आकाश गोरख, भालेराव दादा, लोंढे बालाजी, मोरे शिवाजी, पवार मनोज या आणि अशा अनेक शेतकऱ्यांचे पिके उद्धस्त झाली. एकराच्या एकर उसाचे पीक जमिनीवर लोळत आहे.
कित्येकांना कर्जावर बियाणे विकत घ्यावं लागलं, मजुरीची रक्कम उधारीवर द्यावी लागली, आणि आता सगळं जातं म्हणून शेतकऱ्यांच्या नजरेत केवळ रिकामी आशा दिसते.
आजवर झालेल्या अतिवृष्टी, गारपीट, अवकाळी पाऊस, बाजारभाव कोसळणे, वीजबिलांच्या नोटिसा, कर्जबाजारीपणा, विम्याचे अपूर्ण वाटप, पीक कर्ज नाकारणे... या सगळ्या पातकांची किंमत शेतकऱ्यानेच का भरायची? असा सवाल आता या पीडित शेतकऱ्यांना सतावत आहे. रानमळा शिवारात इतकं मोठं नुकसान झालं, तरी गेवराईचे महसूल अधिकारी, कृषी अधिकारी, तहसीलदार यांनी अद्यापही या परिसरात ना भेट दिली ना शेतकऱ्यांशी संवाद साधला. अत्यंत उदासीनता प्रशासनाची या ठिकाणी दिसून आली आहे.
शेतकऱ्यांच्या शासन दरबारी मागण्या
पंचनामे करून त्याचा अहवाल ७२ तासांत सादर करावा पीक विमा व आर्थिक मदत एक महिन्यात वितरित व्हावी स्थानिक अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी व्हावी या मागण्यांसह रानमळा शिवारातील शेतकरी आता एकवटू लागले आहेत.