गेवराई, पुढारी प्रतिनिधी | Gevrai Shevgaon Road Condition
गेवराई – शेवगाव रोडवरील धोंडराई, तळणेवाडी, उमापूर यांसारख्या परिसरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, नागरिकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या रस्त्यांवर जागोजागी खोल खड्डे पडले आहेत, ज्यामुळे लहान-मोठ्या वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
28 किलोमीटरचा रस्ता पूर्णपणे खड्डेमय
गेवराई–शेवगाव रोडवरील गेवराई तालुक्यातील महार टाकळीपर्यंतचा जवळपास 28 किलोमीटर अंतरावरील रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. मुख्य रहदारीच्या रस्त्यांसोबतच नागरी वसाहतीतील अंतर्गत रस्ते देखील उखडून गेले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने या खड्डे बुजविण्याच्या महत्त्वाच्या कामाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.
निकृष्ट कामाचा ग्रामस्थांचा आरोप
ग्रामस्थांच्या मते, केवळ तीन वर्षांपूर्वीच या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्यामुळे इतक्या लवकर रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. परिणामी, काही ठिकाणी रस्ता पूर्णपणे खचला असून, वाहनधारकांना धोकादायक परिस्थितीत प्रवास करावा लागत आहे. निकृष्ट काम करणाऱ्या संबंधित कंत्राटदाराची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
अपघाताचा धोका वाढला
हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. या मार्गावरून गेवराई–पुणे, मुंबई, शिर्डी, शेवगाव, अहिल्यानगर (अहमदनगर), आळेफाटा, भिवंडी, नेवासा आदी ठिकाणी बससह इतर दुचाकी व चारचाकी वाहने नियमितपणे धावत असतात. मात्र, रस्त्यावरील खोल खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गोपाळवस्ती, बेलगाव, रामनगर, धोंडराई, तळणेवाडी, भोजगाव, उमापूर, गुळज फाटा, चकलांबा फाटा, धुमेगाव, अर्धं पिंपरी यांसारख्या भागातील शेकडो नागरिकांना रोज याच रस्त्यावरून ये-जा करावी लागते.
या गंभीर समस्येकडे लोकप्रतिनिधींनी तात्काळ लक्ष घालावे, अशी सर्वसामान्य नागरिकांची तीव्र मागणी आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष पप्पू गायकवाड यांनी, रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजविले नाहीत, तर तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे.