

Farmer sets himself on fire in Aushya, dies during treatment
औसा, पुढारी वृत्तसेवा : अतिवृष्टीमुळे पिके उद्ध्वस्त झाल्याने झालेल्या आर्थिक नुकसानीचा ताण असह्य झाल्याने औसा तालुक्यातील नागरसोगा येथील बिभीषण पंढरीनाथ साळुंके (वय ३३) या तरुण शेतकऱ्याने रविवारी रात्री स्वतःच्या घरात स्वतःस पेटवून घेतले उपचारादरम्यान सोमवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर नागरसोगा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
मयत बिभीषण पंढरीनाथ साळुंके यांना एक एकर शेती आहे. त्यांच्या नावे विविध कार्यकारी सोसायटीचे कर्ज इतर खासगी देणी असून शेतीमध्ये काहीच निघालेले नाही. आता हे कर्ज फेडायचे कसे आणि वर्ष भागवायचे कसे या चिंतेत ते होते. वृद्ध आई-वडिलांची जबाबदारी, त्यातही वडिलांच्या अंधत्वामुळे आलेली बिकट परिस्थिती आणि वाढते कर्ज यामुळे ते मानसिक तणावात होते.
ताण असह्य झाल्याने त्यांनी रविवारी आत्मदहनाचा प्रयत्न केला. लातूर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. विभीषण यांच्या पश्चात वृद्ध आई, वडील, विवाहित बहीण असा परिवार आहे. या घटनेने संपूर्ण नागरसोगा गाव शोकमग्न झाले आहे.
दरम्यान अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होत नसल्याने शेतकरी त्रस्त असून, दिलासा देण्याची मागणी केली जात आहे.