

गेवराई : ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी बीड जिल्ह्यातील आमदार विजयसिंह पंडित आणि आमदार प्रकाशराव सोळंके यांच्यावर केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद गेवराई शहरात उमटले. संतप्त झालेल्या मराठा आणि ओबीसी समाजातील युवकांनी प्रा. हाके यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला आधी दंडुकाने मारहाण केली, नंतर तो पायाखाली तुडवून जाळला. या घटनेमुळे शहरातील राजकीय वातावरण तापले असून, आमदार समर्थकांनी हाके यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
गेवराई शहरात आज आमदार विजयसिंह पंडित यांच्या समर्थकांनी प्रा. लक्ष्मण हाके यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला. दीपक तात्या आतकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जमलेल्या कार्यकर्त्यांनी, "तुम्ही कोणाला आणि काय बोलताय, याचे भान ठेवा," अशा शब्दांत हाकेंना इशारा दिला. "विजयसिंह पंडित आणि शिवछत्र परिवार हा अठरा पगड जातींसाठी अहोरात्र काम करणारा नेता आहे," असे सांगत कार्यकर्त्यांनी हाके यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केले. संतापाच्या भरात कार्यकर्त्यांनी पुतळ्याला लाथाबुक्क्यांनी तुडवत आणि शिव्यांची लाखोली वाहत त्याचे दहन केले. यावेळी सोमनाथ गिरगे, मुक्ताराम अव्हाड, संजय दाभाडे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
समर्थकांचे आरोप आणि भूमिका
राजकारणात समाज आणू नका: "समाजाचा विषय वेगळा आणि राजकारण वेगळे. तुम्ही सामाजिक मुद्द्यांना राजकीय रंग देत आहात," असे आंदोलकांनी म्हटले. त्यांनी आठवण करून दिली की, मागील लोकसभा निवडणुकीत जेव्हा ‘ओबीसी विरुद्ध ओपन’ असा संघर्ष निर्माण झाला होता, तेव्हा याच शिवछत्र परिवाराने ओबीसी नेत्यांच्या विजयासाठी जीवाचे रान केले होते.
पंडितांचे सामाजिक कार्य: कार्यकर्त्यांनी दावा केला की, आमदार विजयसिंह पंडित यांनी गेवराई तालुक्यात धनगर समाजासह सर्वच समाजांना न्याय दिला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यपदांपासून ते नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीपर्यंत अनेक संधी त्यांनी समाजातील लोकांना दिल्या आहेत.
'सुपारी' घेऊन बदनामीचा डाव: "आमदार विजयसिंह पंडित यांची वाढती क्रेझ आणि लोकप्रियता पाहूनच कुणीतरी तुम्हाला त्यांची बदनामी करण्याची सुपारी दिली आहे, यात तीळमात्र शंका नाही. गेवराईची जनता तुमच्या वक्तव्याला भीक घालणार नाही," असा थेट आरोप आंदोलकांनी केला.
सामाजिक सलोख्याचे आवाहन: मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा संदर्भ देत आंदोलकांनी सांगितले की, "हा लढा गोरगरीब, कष्टकरी समाजाचा आहे. यात कोणीही जातीय तेढ निर्माण करून वातावरण दूषित करू नये. आमचा लढा न्यायासाठी आणि हक्कासाठी आहे आणि तो आम्ही जिंकणारच."
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
या घटनेमुळे बीड जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आधीच संवेदनशील असलेल्या वातावरणात, दोन प्रमुख नेत्यांवरील टीकेमुळे हा नवा वाद निर्माण झाला आहे. प्रा. लक्ष्मण हाके यांच्या वक्तव्यामागे नेमका काय हेतू होता आणि या आंदोलनाचे राजकीय परिणाम काय होतील, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.