ओबीसी आंदोलनातील नेते लक्ष्मण हाके यांना मद्य प्राशन करताना पकडल्याचा दावा मनोज जरांगे समर्थकांनी केला आहे. तसेच, त्यांनी हाके यांना कोंढवा पोलिस ठाण्यात आणले. या ठिकाणी जरांगे समर्थक व हाके यांच्यात बाचाबाची झाली. दरम्यान, हाके यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला. मात्र, त्यानंतर लक्ष्मण हाके यांनी माध्यमांसमोर येत आपल्याला जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला आहे. तसेच, आपण मद्य प्यालो नसल्याचे सांगताना वैद्यकीय चाचणीस तयार असल्याचे म्हटले आहे.
मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे. त्याबाबत लक्ष्मण हाके यांनी टीकाटिप्पणी केली होती. कोल्हापूरचे संभाजी राजे यांच्याबद्दलही त्यांनी नुकतेच वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवर जरांगे समर्थकांनी लक्ष्मण हाके यांना कोंढवा परिसरात गाठले. हाकेंनी मद्य प्राशन केल्याचा दावा जरांगे समर्थकांनी केला. दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये काही लोक हाके यांना घेऊन जाताना दिसत आहेत. हा सर्व प्रकार एका व्यक्तीने आपल्या मोबाईल कॅमेर्यामध्ये कैद केला होता. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जरांगे समर्थक आणि हाके यांना कोंढवा पोलिस ठाण्यात आणण्यात आले. हाके यांनी मद्य प्राशन केल्याबाबत त्यांची वैद्यकीय चाचणी करावी, अशी मागणी जरांगे समर्थकांनी केली, तर हाके यांनी आपण मद्य प्राशन केले नसल्याचा दावा केला आहे. यापूर्वीही आपल्याबद्दल अशाच घटना घडल्याचे हाके यांनी म्हटले आहे. या वेळी मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी करत हाके यांच्या वैद्यकीय चाचणीची मागणी केल्यानंतर त्यांना रात्री पावणेबाराच्या सुमारास पोलिस बंदोबस्तात ससून रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान, या वेळी जरांगे समर्थकांनीही हाके यांनी जिवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप केला.