

Farmers in Beed district will take lessons in natural farming
बीड, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग व आत्मा बीड यंत्रणेच्या वतीने नैसर्गिक शेतीचा प्रसार व शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशाने विविध प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून बीड जिल्ह्यातील ५२ शेतकरी नैसर्गिक शेतीचे घडे घेण्यासाठी रविवारी (दि. ३१ मे) कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी मठ येथील कृषी विज्ञान केंद्राकडे रवाना झाले.
सन २०२६-२७ मधील शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत १ ते ३ जून या कालावधीत करवीर तालुक्यातील कणेरी येथील कृषी विज्ञान केंद्रात तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. प्रकल्प संचालक आत्मा सुभाष साळवे व प्रकल्प उपसंचालक सुरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बीडचे तालुका कृषी अधिकारी अशोक साळी व वडवणीचे तालुका कृषी अधिकारी भुजंग खेडकर यांनी या प्रशिक्षणाचे नियोजन केले आहे.
आत्मा कार्यालयाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. त्यातून पहिल्या टप्प्यात बीड तालुक्यातील २६ व वडवणी तालुक्यातील २६ अशा एकूण ५२ शेतकऱ्यांची निवड करण्यात आली. विशेष म्हणजे या प्रशिक्षणासाठी महिला शेतकऱ्यांचा सहभाग लक्षणीय असून नैसर्गिक शेतीविषयी महिलांमध्ये वाढती जागरूकता दिसून आली.
प्रकल्प संचालक सुभाष साळवे यांनी हिरवा झेंडा दाखवून शेतकरी पथकाला शुभेच्छा दिल्या. आत्मा योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या प्रवास, निवास व प्रशिक्षण शुल्काची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यांतील शेतकऱ्यांसाठीही अशाच प्रकारच्या प्रशिक्षणांचे नियोजन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. इच्छुक शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील आत्मा यंत्रणेशी संपर्क साधून नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
याप्रसंगी उपकृषी अधिकारी राजेंद्र राऊत यांच्यासह आगलावे, भालसंकर, सहायक कृषी अधिकारी शुभम गभाले उपस्थित होते. प्रशिक्षणाचे आयोजन व शेतकऱ्यांच्या प्रवासाचे नियोजन यासाठी सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक अशोक काळे (बीड), सुदर्शन आंधळे (वडवणी) तसेच तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जुबेर पठाण यांनी विशेष परिश्रम घेतले.
नैसर्गिक शेती काळाची गरज : अॅड. शेख
यावेळी अॅड. सादेक शेख (जिल्हा व सत्र न्यायालय) उपस्थित होते. त्यांनी सध्याच्या बदलत्या वातावरणीय परिस्थितीत मानवी आरोग्य आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी नैसर्गिक शेती काळाची गरज असल्याचे सांगितले. तसेच कृषी विभाग आणि आत्मा यंत्रणेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रशिक्षण कार्यक्रमांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.