

Entring into the house for twenty thousand and brutally beating
बीड, पुढारी वृत्तसेवा : उसने घेतलेले वीस हजार रुपये परत का करत नाही याचा जाब विचारत एका तरुणाला घरात घुसून लाकडी दांड्याने बेदम मारहाण केल्याची घटना अयोध्यानगर भागात फे ब्रुवारी महिन्यात घडली होती. या प्रकरणात शुक्रवारी रात्री पेठबीड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकाश माने (२४, रा. अयोध्यानगर, बीड) असे मारहाण झालेल्या युवकाचे नाव आहे. आकाश हा विटभट्टीवर मजुर म्हणून काम करतो. काही दिवसांपूर्वी त्याने शहरातीलच कालिकानगर भागात राहणार्या सिद्धार्थ संजय जाधव व रोहित संजय जाधव यांच्याकडून वीस हजार रुपये उसने घेतले होते. ते परत का करत नाही म्हणून सिद्धार्थ व रोहित या दोघा भावांनी अयोध्यानगर भागात आकाश माने याच्या घरी जावून जातीवाचक शिवीगाळ करत लाकडी दांड्याने जबर मारहाण केली.
गंभीर बाब म्हणजे हा सगळा प्रकार चित्रीत करण्यात आला होता. त्याचा व्हीडीओ आता व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची चर्चा झाली. यानंतर आकाश माने याने पेठबीड पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली असून त्यानुसार दोघांविरोधात अॅट्रॉसिटीसह घरात घुसून मारहाण केल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी बाळकृष्ण हनपुडे पाटील हे करत आहेत.
बीड जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून मारहाण करत त्याचा व्हिडिओ काढण्याचे प्रकार वाढले आहेत. आकाश माने याला मारहाण करतांना देखील व्हीडीओ काढण्यात आला असून त्याला बॅकग्राऊंडला सिनेमातील गाणे देखील ऐकायला मिळते.
अशा पद्धतीने मारहाण करत त्याचा व्हिडिओ काढण्याचा पॅटर्नच बनला असून हा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपींच्या विरोधात यापूर्वी देखील गुन्हे दाखल झाल्याची माहिती असून त्या दिशेने पोलिस तपास करत आहेत.