

गेवराई : बीडमधील गेवराईच्या तलवाडा पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील एका एकवीस वर्षीय युवकास पाच जणांनी जबर मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना काल घडली.आज त्या युवकाचा छत्रपती संभाजीनगर येथे उपचार घेत असताना मृत्यू झाला. शिवम काशिनाथ चिकणे (वय २१)रा. गंगावाडी ता.गेवराई जि.बीड असे या घटनेत मृत झालेल्या युवकाचे नाव आहे.
शुक्रवारी(ता १८) शिवम हा गंगावाडी तलवाडा रस्त्यावरून जात असताना त्यास अडवून पाच जणांनी जुन्या भांडणाची कुरापत अन् प्रेमसंबंधाच्या संशयावरून बेदम मारहाण केली. या मारहाणीत शिवम चिकणे हा गंभीर जखमी झाला. शिवम यास मारहाण केल्याची माहीती फोनवरून चुलते भास्कर चिकणे यांना मिळताच घटनास्थळावर धाव घेतली. जखमी शिवम यास प्राथमिक उपचारार्थ तलवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. परंतू त्याची गंभीर स्थिती पहाता पुढील उपचारार्थ गेवराई येथे हलविण्यात डॉक्टर यांनी सांगितले. गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर यांनी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्याचा सल्ला दिला.तेथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना आज शिवम चिकणे याचा मृत्यू झाला.
दरम्यान काल काशिनाथ चिकणे यांच्या तक्रारीवरून शिवम गणेश यादव, सत्यम छगन मांगले, गणेश सुखदेव यादव, राजाभाऊ उत्तम यादव आणि ईश्वर गोवर्धन यादव रा.सर्व गंगावाडी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मृत झाल्याने खूनाचा गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहीती तलवाडा पोलीसांनी दिली.या घटनेचा तपास फौजदार स्वप्नील कोळी हे करत आहेत.