

Majalgaon Renapuri missing youth body found
माजलगाव : माजलगाव शहरालगतच्या रेनापुरी गावातील गुरुवारपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह शनिवारी (दि.१९) सकाळी सिंदफना नदीच्या पाण्यात आढळून आला. ही घटना माजलगाव धरणाच्या पायथ्याशी, धर्मराज मंदिराच्या मागे, सकाळी आठ वाजता उघडकीस आली.
मृत व्यक्तीची ओळख पटली असून रेनापुरी येथील नवनाथ बाबुराव चव्हाण (वय ४०) असे त्याचे नाव आहे. नवनाथ चव्हाण हे गुरुवारी (दि.१७) दुपारपासून बेपत्ता होते. त्यांच्या बेपत्ताबाबत कुटुंबीयांनी १८ जुलै रोजी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
शनिवारी सकाळी स्थानिक नागरिकांना नदीच्या पाण्यात मृतदेह दिसून आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढण्याची कार्यवाही सुरू केली. मृतदेहाची ओळख पटवून तो नवनाथ चव्हाण यांचा असल्याचे स्पष्ट झाले.
नवनाथ चव्हाण हे जनावरे चारण्यासाठी नेहमी या परिसरात जात असत. मात्र, ते नदीच्या पाण्यात कसे आणि केव्हा पडले, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून, मृत्यूचे नेमके कारण शोधले जात आहे. या घटनेमुळे रेनापुरी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.