

शिरूर : मराठा समाजामुळे ओबीसी आरक्षण धोक्यात आल्याचे म्हणत नैराश्येतून वृद्धाने राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपविले. ही घटना रविवारी (दि.१२) रात्रीच्या सुमारास शिरूर तालुक्यातील पाडळी येथे घडली. बबन तुळशीराम दुधाळ (वय ६०) असे मृताचे नाव आहे. मुलगा कृष्णा बबन दुधाळ यांनी दिलेल्या माहितीवरून शिरूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
शिरूर कासार तालुक्यातील पाडळी या गावचे रहिवासी असलेले बबन दुधाळ हे गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटनुसार ओबीसीमध्ये आरक्षण दिल्यामुळे ओबीसी आरक्षण धोक्यात आले आहे, असे म्हणत ते नैराश्येत गेले होते. त्यांचा मोठा मुलगा सावता बबन दुधाळ हा कोल्हापूर येथे स्पर्धा परीक्षेची तयारी असून छोटा मुलगा कृष्णा बबन दुधाळ तालुक्यातील तागडगाव येथील कॉलेजमध्ये बीएच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात येणार असल्याने आपल्या मुलांचे भवितव्य धोक्यात आले आहे, असे म्हणत नैराश्येतून रविवारी रात्री त्यांनी राहत्या घरात आपली जीवनयात्रा संपविली.