

young man ended his life by taking poison
केज : गौतम बचुटे
मल्टीस्टेटमध्ये मुदतीच्या ठेव योजनेत पैसे बुडाल्याच्या नैराश्येतून केज तालुक्यातील कोरेगाव येथील एका कृषी पदवीधारक तरुणाने विष प्राशन करून आपले जीवन संपवल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील सुरज शिवाजी तांदळे हा कृषी पदवीधर असून, त्याची दीड एकर जमीन आहे. त्याने २० ऑक्टोबर २०२१ रोजी मल्टीस्टेट सोसायटीत एक लाख रुपये मुदत ठेव योजनेत गुंतवलेले होते. एक वर्षा नंतर त्याचे १ लाख ८ हजार २५० रु. मिळणार होते. त्यांची मुदत संपल्यानंतर त्यांनी पैसे परत मिळण्यासाठी अनेकवेळा पैशाची मागणी केली. तसेच अनेकवेळा गेवराई येथे खेटे घातले.
मात्र त्यांच्या मागणीला मल्टीस्टेटच्या अधिकाऱ्यांनी किंवा त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे सुरज तांदळे हा पैसे बुडण्याच्या भीतीने प्रचंड मानसिक तणावात होता. त्या मानसिक तणाव आणि नैराश्यातून त्याने कोरेगाव ता. केज येथे त्याच्या राहत्या घरी दि. ३ मे रोजी सकाळी ९:०० वाजण्याच्या सुमारास घरी कोणी नसताना विषारी द्रव्य प्राशन केले. ही माहिती त्याच्या वृद्ध आजीला झाल्यानंतर गावकऱ्यांच्या मदतीने त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालय केज येथे प्रथमोचार करून संदर्भिय उपचारासाठी त्याला अंबाजोगाई येथील ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे दाखल करण्यात आले होते.
दरम्यान दि. ४ मे रोजी सायंकाळी ४:०० वाजण्याच्या सुमारास उपचार सुरू असताना सुरज शिवाजी तांदळे याचा मृत्यू झाला. या बाबत मृत सुरज तांदळे याचा भाऊ प्रकाश तांदळे यांनी प्रतिनिधींशी संपर्क साधला असून या संदर्भात त्याच्या मृत्यू प्रकरणी पोलीस ठाण्यात सोसायटी विरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार देणार असल्याची माहिती दिली आहे.