

Drunken man pelts bus with stones at Ashti bus stand; passenger safety concerns come to the fore
आष्टी : पुढारी वृत्तसेवा आष्टी बसस्थानकाच्या आवारात एका मद्यधुंद माथेफिरूने धिंगाणा घालत प्रवासी बसवर दगडफेक केल्याच्या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बसमध्ये प्रवासी असतानाच दगडफेक झाल्याने एखादी मोठी दुर्घटना घडली असती तर त्याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
बसस्थानक की दारुड्यांचा अड्डा?
आष्टी बसस्थानक परिसरात मद्यपींचा वावर वाढल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून होत आहेत. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थिनींना या प्रकारामुळे मोठी कुचंबणा सहन करावी लागत असल्याचे सांगितले जात आहे. बसची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून, बसस्थानक परिसरात पोलिसांची नियमित गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.
जेवणाचे बोर्ड, पण मागच्या दाराने दारूविक्रीचा आरोप
बसस्थानक परिसरातील काही ठिकाणी जेवणाचे बोर्ड लावून त्याआडून विना परवाना देशी दारू अथवा हातभट्टीची विक्री होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. बाजारतळ परिसरातील कथित विनापरवाना देशी दारू विक्रीही मागील बाजूने सुरू असल्याची चर्चा आहे. या आरोपांची उत्पादन शुल्क विभाग व पोलिस प्रशासनाने तातडीने तपासणी करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
महिला प्रवाशांची कुचंबणा; प्रशासनाचे लक्ष कधी जाणार?
बसस्थानक परिसर हा सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरक्षित असणे अपेक्षित असताना, मद्यपींचा वाढता वावर आणि त्यातून निर्माण होणारे प्रकार चिंताजनक असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. दारूच्या नशेत धिंगाणा घालणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासोबतच बसस्थानक परिसरातील कथित बेकायदा दारूविक्रीची चौकशी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
दगडफेकीच्या घटनेची गंभीर दखल घेण्याची गरज
प्रवासी बसवर दगडफेक होणे ही केवळ किरकोळ घटना नसून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या सुरक्षेशी संबंधित गंभीर बाब आहे. संबंधित व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई झाली का? बसस्थानक परिसरात बेकायदा दारूविक्री होत असल्यास त्यावर कारवाई का होत नाही? या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने जनतेसमोर देण्याची गरज आहे.
आष्टी बसस्थानक परिसरातील मद्यपींचा वावर, कथित अवैध दारूविक्री आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न यावर पोलीस प्रशासन, राज्य परिवहन महामंडळ व उत्पादन शुल्क विभागाने संयुक्तपणे लक्ष घालून तातडीने कारवाई करावी, अशी मागणी प्रवासी व नागरिकांतून होत आहे.