

Ashti Farmers Protest
कडा : दुष्काळाच्या झळांनी आष्टी तालुक्यातील शेतकरी अक्षरशः होरपळून निघाला आहे. पाण्याअभावी पिकांचे मोठे नुकसान झाले असून पशुधनासाठी चारा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शेतमजुरांच्या हाताला काम नाही, तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च पालकांना परवडेनासा झाला आहे. अशा परिस्थितीत सरकारने केवळ घोषणा आणि तुटपुंजी मदत देऊन शेतकऱ्यांची चेष्टा न करता त्यांना हक्काची आणि ठोस आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते तथा युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी केली.
धामणगाव येथे आयोजित शेतकरी आक्रोश रास्ता रोको आंदोलनात ते बोलत होते. शेख म्हणाले, ‘‘सरकारने आष्टी, पाटोदा, शिरूरसह राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र, केवळ दुष्काळ जाहीर करून सरकारची जबाबदारी संपत नाही. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्यक्ष आणि भरीव मदत जमा होणे आवश्यक आहे.’’
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत, शेतमजुरांना २५ हजार रुपयांची आर्थिक मदत, विद्यार्थ्यांची संपूर्ण वर्षाची शैक्षणिक फी माफी तसेच हॉस्टेल व मेसचा खर्च शासनाने करावा, अशी मागणी त्यांनी केली. पशुधन वाचविण्यासाठी शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट अनुदान जमा करण्याबरोबरच पुरेशा प्रमाणात चारा उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली.
आष्टी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेतकरी दुग्ध व्यवसायावर अवलंबून आहेत. दुष्काळामुळे चारा आणि पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने पशुधन जगविण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळे शासनाने तातडीने मदत करणे गरजेचे असल्याचे शेख यांनी सांगितले. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे शेती, पिके, पशुधन, विहिरी, घरे आणि दुकानांचे झालेल्या नुकसानीची प्रलंबित भरपाईही तातडीने द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
‘‘शेतकरी सरकारकडे भीक मागत नाही, तर आपल्या हक्काची मदत मागत आहे. शेतकऱ्यांच्या घामाची किंमत सरकारने द्यायलाच हवी. केवळ कागदावरील घोषणा नकोत; शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्यक्ष मदत जमा झाली पाहिजे,’’ असे शेख यांनी स्पष्ट केले.
सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घेतला नाही, तर यापुढे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी युवक जिल्हाध्यक्ष सतीश शिंदे, तालुकाध्यक्ष सुनील नाथ, ज्येष्ठ नेते अण्णासाहेब चौधरी, प्रदेश युवक सचिव रिजवान शेख, जिल्हा युवक कार्याध्यक्ष राहुल काकडे, संजय थोरवे, जगन्नाथ ढोबळे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते. युवक तालुकाध्यक्ष विजय गाढवे यांनी या शेतकरी आक्रोश रास्ता रोको आंदोलनाचे आयोजन केले होते.