

अतुल शिनगारे
धारूर : धारूर घाटात रविवारी मध्यरात्री भीषण अपघात घडला. हैदराबादहून संभाजीनगरकडे माल घेऊन जाणाऱ्या टँकरचे ब्रेक निकामी झाल्याने वाहनावरील नियंत्रण सुटून टँकर सुमारे 300 फूट खोल दरीत कोसळला. अपघातानंतर टँकरला भीषण आग लागली. मात्र चालकाने प्रसंगावधान राखत वेळेत उडी मारल्यामुळे त्याचा थोडक्यात जीव वाचला.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच 14 जे 460099 क्रमांकाचा टँकर हैदराबादहून संभाजीनगरकडे कपटे घेऊन जात होता. धारूर घाटातील धोकादायक वळणावर पोहोचताच अचानक टँकरचे ब्रेक निकामी झाले. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून टँकर थेट घाटातील खोल दरीत कोसळला. टँकर दरीत पडताच त्याला भीषण आग लागली आणि मोठ्या प्रमाणात ज्वाळा उसळल्या.
या आगीत आसपासच्या डोंगरावरील झाडाझुडपांनाही आग लागल्याने काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.दरम्यान, चालक महादेव बिक्कड यांनी प्रसंगावधान राखत वेळेत उडी मारल्यामुळे मोठा अनर्थ टळला. अपघातात त्यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर केज येथे उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
घटनेची माहिती मिळताच धारूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देवीदास वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल शेख जमीर यांच्यासह पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी प्रसंगावधान राखत चालकाला सुरक्षित बाहेर काढून तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात पाठविले.
दरम्यान, टँकरला आणि डोंगरावरील झाडाझुडपांना लागलेली आग विझवण्यासाठी नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या पथकाने अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत टँकरमधून धुराचे लोट निघत असल्याचे दिसून येत होते.
या घटनेमुळे काही काळ घाटातील वाहतूकही विस्कळीत झाली होती.घाटातील अपघातांच्या वारंवार घटनांनंतरही लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे घाटाच्या दुरुस्ती व सुरक्षेच्या कामांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
घाटातील अपघातांची मालिका थांबणार कधी?
धारूर घाटातील धोकादायक वळणामुळे अपघातांची मालिका सुरूच असून मागील वर्षभरात ट्रक किंवा टँकर दरीत कोसळण्याची ही पाचवी-सहावी घटना असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे हा घाट वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक ठरत असून वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. घाटाचे रुंदीकरण, संरक्षण भिंती, योग्य सूचना फलक आणि इतर सुरक्षा उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात, अशी मागणी नागरिक आणि वाहनचालकांकडून होत आहे.